मिरज : मिरजेत बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात असाध्य आजार बरे करण्यासाठी औषधोपचाराच्या नावावर रुग्णांची हजारो रुपयांची लूट सुरू आहे. बोगस आयुर्वेदिक औषधे देऊन फसवणूक व दमदाटी केल्याची तक्रार रिपाइं खरात गटाचे कार्यकर्ते टिपू ईनामदार यांनी शहर पोलिसात केली आहे.मिरजेत परजिल्ह्यातून व कर्नाटकातून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात रस्त्यावर कंगवे व इतर साहित्य विक्रीच्या बहाण्याने बसलेल्या महिला व एजंट या रुग्णांना आयुर्वेदिक औषधाने असाध्य आजार बरे होत असल्याच्या भूलथापा देऊन आयुर्वेदिक औषध दुकानात नेतात. तेथे बसवलेले भोंदू डाॅक्टर रुग्णाला खात्रीने आजार बरा करण्याच्या भूलथापा देऊन १० ते ५० हजार रुपये किमतीला औषधे गळ्यात मारतात.या औषधामुळे काहीच फायदा होत नसल्याने त्याची तक्रार घेऊन कोणी आल्यास त्यास दमदाटी व मारहाण करून पिटाळून लावण्यात येते. याबाबत वारंवार पोलिसात तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, रुग्णांची लूटमार सुरूच आहे. मिरजेत स्टेशन रोड परिसरात आठ ते दहा औषध दुकाने असून दुर्गेश नामक भामटा विनापरवाना औषध दुकाने चालवत असल्याची तक्रार आहे. आरपीआय खरात गटाचे टीपू पटवेगार, सोहेल इनामदार यांनी समर्थ आयुर्वेदिक औषध दुकानदाराकडून फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे.वजन कमी करण्यासाठी ५० रुपये किमतीचे औषध दोन हजार रुपये घेऊन दिले. या औषधाचा फायदा झाला नसल्याने विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर दुर्गेश याने दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मिरजेत रुग्णांच्या फसवणूकप्रकरणी अशा बोगस आयुर्वेदिक औषध दुकानांवर कारवाई करण्याची मागणी इनामदार यांनी केली आहे.
Sangli- मिरजेत औषधोपचाराच्या बहाण्याने भोंदूकडून रुग्णांची लूट, पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 6:21 PM