मिरजेत राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रभागातील कामावरून संघर्ष उफाळला आहे. प्रभाग वीसमधील नगरसेविका स्वाती पारधी यांनी थेट नगरसेविका पदाचा राजीनामा गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडे दिला. राष्ट्रवादीचे मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे प्रभागात काम करू देत नाहीत, विकासकामांमध्ये हस्तक्षेप करून कामे बंद पाडत असल्याचा आरोप करत स्वाती पारधी व योगेंद्र थोरात यांनी महापालिका कार्यालयासमाेर ठिय्या मारला.
प्रभाग २० मधून निवडून आलेल्या नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे सार्वजनिक ठिकाणी वारंवार अपमान करतात, प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना ‘माझी परवानगी घेतल्याशिवाय प्रभागात फिरायचे नाही’, असे धमकावतात. माझ्या नगरसेवक निधीतून माझ्या लेटर पॅडवर परस्पर कामे सुचवतात. मी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी माझ्या परस्पर उद्घाटन घेतात. यास विरोध केल्यानंतर अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ करतात, असे नगरसेविका पारधी यांनी गटनेते बागवान यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत बागवान यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत संबंधित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाद संपविणार असल्याचे सांगितले.
चाैकट
पाेलिसांत तक्रार दाखल
नगरसेविका पारधी यांनी हारगे यांच्याविरुद्ध पोलिसांतही तक्रार दिली आहे. नगरसेवक थोरात यांनीही हारगे यांनी प्रभागात नळ कनेक्शन जोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून पिटाळून लावल्याने त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपायुक्तांना दिले आहे.
चाैकट
भानगडी बाहेर काढणार
याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित हारगे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, पारधी कोणाच्या तरी शिकविण्यावरून खोटे आरोप करत आहेत. वारंवार ॲट्रासिटीची भीती दाखवत दबाब निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नगरसेविका पारधी व त्यांच्या साथीदारांच्या टक्केवारीच्या भानगडी बाहेर काढणार आहे.
फाेटाे : २८१२२०२० मिरज ०२ : मिरज येथे साेमवारी नगरसेविका स्वाती पारधी यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा साेपविला.