मिरजेतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह ५३ जणांना पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान महापालिका क्षेत्रातून हद्दपारीची नोटीस बजावली आहे. दि. १४ रोजी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासमोर याबाबत सुनावणी व निर्णय होणार आहे.
२००९च्या मिरज दंगलीमध्ये गुन्हे दाखल असलेल्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव कालावधीत बारा दिवसांसाठी महापालिका क्षेत्रातून हद्दपार करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी शिंगटे यांच्यासमोर याबाबत सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राजकीय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मिरज दंगलीत राजकीय नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. शासनाने नेत्यांवरील दंगलीचे गुन्हे मागे घेतले. मात्र, कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून त्यांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. गणेशोत्सव काळात मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १६३ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव शिंगटे यांच्याकडे पोलिसांनी दाखल केले आहेत.
चाैकट
सर्वच पक्षाचे पदाधिकारी
मिरजेतील शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित हारगे, मिलिंद हारगे, महेश बसरगे, भाजपचे जयगोंड कोरे, ओंकार शुक्ल, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, संदीप शिंदे, प्रशांत मंगावते, अभिजित कुरणे, अनिकेत नरगुंदे, संतोष चव्हाण, अभिजित माने, कार्तिक जाधव, शंकर मुरलीधर पवार, उत्तम बन्ने, प्रमोद हुलवान, बाळू बन्ने, मारुती सिसाळ, मंगेश हुलवान, पवन बंडगर, महावीर हुलवान, उमेश मिरजे, श्याम भंडारे, आनंद सातपुते, भास्कर सातपुते, अमर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर देवमाने, राहुल सातपुते, किरण सातपुते, अनिल सातपुते, प्रशांत साळे, प्रवीण सातपुते, पंडित इसरडे, सागर तनंगे, अजिज अहमद पटवेगार या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह ५३ जणांना गणेशोत्सव काळात हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.