लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज शहरात जुन्या दोन जलवाहिन्या व अमृत योजना अशा तीन जलवाहिन्यांतून पाणीपुरवठ्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. जुन्या दोन जलवाहिन्या बंद करून केवळ अमृत योजनेच्या वाहिन्यांतूनच पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मिरजेत प्रशासनाला दिले. यामुळे आता मिरजेत पूर्ण क्षमतेने व उच्च दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सोमवारी मिरजेत महापालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनची बैठक पार पडली. बैठकीस स्थायी सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त स्मृती पाटील, प्रभाग सभापती गायत्री कल्लोळी, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, नगरसेवक संजय मेंढे, नगरसेविका संगीता हारगे, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, भगवान पांडव, गजेंद्र कल्लोळी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
महापौर सूर्यवंशी म्हणाले, मिरज शहरात सर्वात जुनी, त्यानंतर टाकलेली एक जलवाहिनी व आता अमृत योजनेची जलवाहिनीमुळे शहरात तिन्ही वाहिन्यांतून पाणीपुरवठा सुरू आहे. तीन वाहिन्यांमुळे पाणी पूर्ण क्षमतेने नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे यापुढे मिरजेत पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेच्या वाहिन्यांतूनच पाणीपुरवठा केला जाईल. जुन्या दोन्ही जलवाहिन्या बंद करण्याच्या सूचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांनी अमृत योजनेच्या जलवाहिन्यांना आपले कनेक्शन जोडून घ्यावे, असे आवाहन महापौर सूर्यवंशी यांनी केले. अमृतच्या वाहिनीतून पाणीपुरवठा झाल्यास मिरजेत उच्च दाबाने व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा महापौर सूर्यवंशी यांनी केला.