मिरज : मिरज-पंढरपूर महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या सहाजणांच्या टोळीस पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने केवळ दोन तासात रंगेहात अटक केली. रोहित राजाराम कार्वेकर (वय २४), रमजान महंमद गडकरी (२०, दोघे रा. दानोळी, ता. शिरोळ), महेश ऊर्फ पिल्या आनंद पारचे (१९, रा. सूतगिरणी चौक, कुपवाड), सिध्दांत सुनील शिंदे (२०, रा. यशवंतनगर, कुपवाड), विनायक रामा पाटील-पडूळकर (२१, रा. कापसे प्लॉट, कुपवाड) या तिघांसह एक अल्पवयीन गुन्हेगाराचा त्यात समावेश आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
शुक्रवारी रात्री ट्रक (क्र. एमएच १० झेड ४१५०) घेऊन चालक दत्तात्रय शामराव जाधव (वय ४०) रत्नागिरी येथून सोलापूरला जात होते. रात्री एक वाजता ट्रक मिरज-पंढरपूर रस्त्यावर डी मार्टसमोर आल्यानंतर दोन मोटारसायकलवरून आलेल्या सहा अज्ञातांनी तो अडवला. त्यानंतर ट्रकचा चालक व क्लिनर यांना लाथा-बुक्क्याने मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल व १९ हजार रूपये रोख रक्कम हिसकावून घेत कळंबीच्या दिशेने पळ काढला.
ट्रक चालकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन लूटमारीची तक्रार दिली. यावेळी रात्रगस्तीस असलेले पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे महामार्गावर पेट्रोलिंग करणारे दरोडा प्रतिबंधक पथक व पोलीस पथक तात्काळ कळंबीच्या दिशेने रवाना झाले.
भोसे गावाच्या हद्दीत जंगली ढाब्यासमोर बेळगावहून इंदोरकडे जाणारा दुसरा मालट्रक (क्र. एमपी ०९ एचएच २२९३) अडवून टोळी चालकाला लुटत असताना दरोडा पथकातील कर्मचाºयांना दिसले. पोलिसांची चाहुल लागताच त्यापैकी चारजण अंधारात पळून गेले, तर रोहित कार्वेकर, रमजान गडकरी या दोन दरोडेखोरांना रंगेहात पकडून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर, पळून गेलेल्या चौघांची पोलिसांना माहिती मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंग ठाकूर, हवालदार चंद्रकांत वाघ, प्रवीण वाघमोडे, एस. के. निकम यांच्या पथकाने पळून गेलेल्या महेश ऊर्फ पिल्या पारचे, सिध्दांत शिंदे, विनायक पाटील या तिघांसह एक अल्पवयीन गुन्हेगार अशा चौघांचा शोध घेऊन त्यांनाही जेरबंद केले. दरोड्याच्या गुन्'ात वापरलेल्या दोन मोटारसायकलींसह ट्रकचालकाकडून लुटलेली रोख रक्कम व मोबाईल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. रोहित कार्वेकर हा शिरोळ परिसरातील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे.याप्रकरणी मिरज शहर व मिरज ग्रामीण पोलिसात दरोड्याचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयाने दि. ११ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.पोलिस पथकाला पारितोषिकराष्टय महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना लुटणाºया आरोपींना मुद्देमालासह पकडण्याची पोलिसांची ही दुसरी वेळ आहे. वाहनचालकांची लूटमार करणाºया दरोडेखोरांना काही तासातच मुद्देमालासह पकडणाºया पोलीस निरीक्षक मोहन जाधव व पोलीस पथकास पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पारितोषिक जाहीर केले.