मित्तल म्हणाले, कोल्हापूर-वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गाचे कोकण रेल्वेकडून सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र निधीअभावी काम थांबले आहे. कोविड लस देशात पोहोचविण्यासाठी शासनाकडून रेल्वेला विचारणा झाल्यास रेल्वेची शीत तापमानाच्या रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्याची तयारी आहे. कोल्हापूर-पुणे महामार्गालगत नवीन रेल्वेमार्ग उभारणीच्या प्रस्तावासाठी राज्य शासनाला तांत्रिक साहाय्य करण्यास रेल्वे तयार आहे. पुणे-मिरज दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामात सातारा जिल्ह्यात भूसंपादनात अडचण निर्माण झाली आहे. रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२३ पासून दुहेरी मार्गावरून रेल्वेगाड्या सुरू होतील.
रेल्वे अर्थसंकल्पात कोल्हापूर व मिरज रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक बनविण्याची घोषणा करण्यात आली होती. कोल्हापूर स्थानक विकसित करण्यासाठी विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र मिरज स्थानकासाठी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत १८ टक्क्यांनी घट झाली असून, नवीन वर्षात मालवाहतुकीतील घट भरून काढण्यात येत असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.