संतोष भिसे सांगली : सांगलीरेल्वे स्थानकाचे वार्षिक उत्पन्न ३९ कोटींवर पोहोचले आहे. पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर असून, मिरजेचे सर्वाधिक म्हणजे ५४ कोटी आहे. कोट्यवधींचे उत्पन्न देऊनही स्थानके विकासापासून वंचितच आहेत. सांगली स्थानकाच्या विकासाला वर्षाकाठी फक्त आठ लाख रुपये मिळतात.
जिल्हा स्थानक असूनही अनास्थाच आहे. प्रवाशांची उदासीनता व लोकप्रतिनिधींच्या बेफिकिरीचा फायदा रेल्वे घेते. मिरज जंक्शन हाकेच्या अंतरावर असल्यानेही सांगलीला नेहमीच सवतीची वागणूकच मिळाली आहे. सांगलीकरांचीही ओरड नाही. त्यांनी रेल्वे स्थानकाला आपले मानलेच नाही.
बाजार समितीच्या स्थापनेनंतर १९७२ मध्ये स्थानक अस्तित्वात आले. दोहोंना परस्परांच्या फायद्याचा हेतू होता, पण तो फलद्रुप झाला नाही. पुणे विभागात विक्रमी उत्पन्न देणारी मिरज आणि सांगली स्थानके सुविधांबाबतीत मात्र मागे राहतात. अधिकारी पाहणी करून जातात, पण मागण्यांची निवेदने कचऱ्यात टाकून देतात.