लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत अडीच कोटी रुपये खर्चाच्या ट्रिमिक्स काँक्रिट व हॉटमिक्स रस्त्याच्या कामाला चार महिन्यांपूर्वी प्रारंभ झाला. मात्र हे काम रखडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
रेल्वेस्थानक रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारांचे काम अपूर्ण आहे. रस्त्याच्या बाजूला झाडे व खोक्यांच्या अतिक्रमणामुळे कामात अडथळा निर्माण झाला आहे. काॅंक्रिट रस्ता करताना रस्त्याकडेची अतिक्रमणे व खोके हटविण्यात आले नाहीत. यामुळे अडीच कोटी रुपये खर्चूनही रस्ता अरुंदच राहणार आहे. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या कामाचे उद्घाटन एक वर्षापूर्वी झाले असून, काम सुरु केले नसल्याने ठेकेदाराला प्रतिदिन दंड आकारण्याच्या आयुक्तांच्या आदेशानंतर दोन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने काम सुरू केले. रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत पूर्ण रुंदीने हा रस्ता झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून वाहतुकीचा अडथळाही दूर होणार आहे. मात्र रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरु असून, रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न कायम आहे. रस्ते कामासाठी गेले चार महिने हा रस्ता बंद करण्यात आल्याने या रस्त्यावरुन वाहतूक बंद आहे. रेल्वेस्थानकासमोर पावसामुळे दलदल निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून पूर्ण रुंदीने रस्ता करण्याची नागरिकांची मागणी आहे.