जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड दरवर्षी होते. दर्जेदार द्राक्ष निर्मिती करण्यासाठी कष्ट घेणार्या शेतकऱ्यांची मात्र व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. यास प्रतिबंधासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी द्राक्षे विक्री करण्यापूर्वी संबंधित व्यापाऱ्याची माहिती घेऊन ही माहिती पोलिसांनाही देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरवर्षी हंगामात राज्यातील व परराज्यातील अनेक व्यापारी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये बुडवून गायब होतात. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, मग त्या व्यापाऱ्यांचा शोध सुरू होतो. मात्र फसवणूक होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी मोहीम सुरू केली आहे.
द्राक्षे विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी व्यापाऱ्यांचे आधारकार्ड, पॅनकार्डसह अन्य माहिती घ्यावी व लेखी व्यवहार करावेत, संबंधित व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यात माहिती देऊन खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी शेतकऱ्यांना केले.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवली जात आहे. दरवर्षी सुमारे ३० ते ५० कोटी रुपयांची फसवणूक होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांची रीतसर नोंदणी व्हावी, अशी अनेक वर्षांची मागणी केली जात होती. त्या मागणीला आता यश आले आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीस आळा बसणार आहे.