सांगली : मध्य रेल्वेतर्फे ३१ मार्चपासून मिरज-सोलापूर नवीन पॅसेंजर सुरू होत आहे. यासाठी डिझेल इंजिन असलेल्या लोकल रेल्वेचा वापर करण्यात येणार आहे. मिरज-सोलापूर लोकलसेवेमुळे प्रवाशांची सोय होणार आहे. मिरज-सोलापूरदरम्यान लोकलसेवेसाठी मुंबईहून डिझेल इंजिन असलेली लोकल आणण्यात आली आहे. बारा बोगींच्या लोकलला दोन्ही बाजूने मोटरमन केबिन आहे. लोकलप्रमाणे आसनव्यवस्था असलेली पॅसेंजर रेल्वे ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नावीन्य ठरणार आहे. मिरजेतून दररोज सकाळी ९ वाजता सुटणारी लोकल दुपारी ३ वाजता सोलापुरात पोहोचणार आहे. दुपारी चार वाजता सोलापुरातून निघालेली लोकल रात्री दहा वाजता मिरजेत पोहोचणार आहे. लोकलसाठी पॅसेंजर रेल्वेचे तिकीटभाडे असणार आहे. यापूर्वी सकाळी सहा वाजता सोलापूरकडे व दुपारी साडेतीन वाजता सोलापुरातून मिरजेकडे येणाऱ्या पॅसेंजरला चांगला प्रतिसाद असल्याने हीसुद्धा पॅसेंजर कायम राहणार आहे. सुट्टीच्या हंगामात मिरज ते सोलापूर दरम्यान नवीन लोकलमुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. (वार्ताहर)
मिरज-सोलापूर लोकल रेल्वेसेवा सुरू होणार
By admin | Published: March 16, 2016 8:28 AM