अडीच विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या मिरज तालुक्यात शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत राबवून ही यंत्रणा सक्षम करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
या चर्चेत विक्रम पाटील, अशोक मोहिते यांनी भाग घेतला. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणार्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचत नाहीत, तालुका कृषी कार्यालयाकडे शेतकरीही येत नाहीत. कृषी विभागाकडील योजना शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी एजंटांची साखळी तोडण्यात यावी, अशी मागणी विक्रम पाटील यांनी केली. तसेच शासकीय योजना सक्षमपणे राबविण्यासाठी तालुकास्तरावर सर्व विभागांच्या अधिकार्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील रस्ते, पाणी पुरवठा योजना व ग्रामपंचायतींच्या विविध कामांचा अशोक मोहिते, विक्रम पाटील, किरण बंडगर, कृष्णदेव कांबळे, काकासाहेब धामणे, रंगराव जाधव यांनी आढावा घेतला. रस्ते कामाबाबत अनेकवेळा मागणी करूनही माहिती दिली जात नसल्याची तक्रार अशोक मोहिते यांनी केली. किरण बंडगर यांनी महावितरण, ग्रामपंचायतींच्या समस्यांकडे लक्ष वेधले. कृष्णदेव कांबळे यांनी रस्त्याच्या साईडपट्टीचे मुरुमीकरण करण्याकरिता रस्त्याकडील मुरुम, माती टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी याबाबत चौकशी करून संबंधित रस्ता ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली.