मिरज : मिरज अर्बन बँकेच्या अवसायनाची मुदत संपल्याने नोंदणी रद्द करण्यासाठी अंतिम सर्वसाधारण सभा पार पडली. नोंदणी रद्द न करता बँकेची पतसंस्था करावी. बड्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करून एकरकमी कर्जफेड योजना सुरु ठेवावी आदी ठराव अंतिम सभेत करण्यात आले. सुमारे ७४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली मिरज अर्बन बँक इतिहासजमा होऊन बँकेवर परिसमापक येणार आहे .
६० कोटी कर्ज घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या मिरज अर्बन बँकेवर १५ वर्षांपूर्वी अवसायक नियुक्ती झाली. सहकार विभागातर्फे चौकशीत दोषी ठरलेल्या संचालकांकडून वसुलीची रक्कमही निश्चित झाली. मात्र, तत्कालीन सहकारमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिल्याने संचालकांकडून वसुली झाली नाही. आता ही स्थगिती उठल्यानंतर थकीत कर्ज वसुली होणार आहे. बँकेच्या ६० कोटी थकीत कर्जापैकी अवसायन काळात ४९ कोटी कर्ज वसूल झाले. अद्याप १२ कोटी कर्जे व त्यावरील १८ कोटी व्याज वसूल होणे बाकी आहे. दि.२५ ऑगस्ट रोजी अवसायकाची मुदत संपल्याने बँकेची नोंदणी रद्दची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यासाठी अंतिम सर्वसाधारण सभेची औपचारिकता अवसायक अनिल पैलवान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नोंदणी रद्द न करता पतसंस्थेच्या स्वरूपात बँक सुरु ठेवावी. बड्या कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करावी. एकरकमी कर्जफेड योजना सुरु ठेवावी आदी सभासदानी मांडलेले ठराव मंजूर करण्यात आले. बँकेत अडकलेल्या एक लाखावरील ठेवी परत देण्यात आल्या आहेत. मुख्य इमारत व मार्केट शाखेच्या इमारतींची सुमारे सहा कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या रकमेतून एक लाखावरील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत देण्यात आल्याचे बँकेचे अवसायक अनिल पैलवान यांनी सांगितले. अवसायकांची मुदत संपल्याने आता बँकेचे परिसमापक थकीत कर्जवसुली करणार आहेत.