सोमनाथ डवरी ।कसबे डिग्रज : विधानसभेच्या निवडणुकांना वर्षभराचा अवधी असताना, मिरज पश्चिम भागात आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.गावोगावचे जुने, नवे, ज्येष्ठ, तरुण, नवउद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांना जवळ करण्यासाठी इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. हल्लाबोल यात्रेच्यानिमित्ताने राष्ट्रवादी रिचार्ज करण्याचा प्रयत्न झाला. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असताना, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक यांनी वनश्री पतसंस्था, तरुणांचे विविध कार्यक्रम, नोकरी मेळावा, महिला बचत गट यांच्या माध्यमातून के्रझ निर्माण केली आहे. भाजपच्यावतीने इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटीलही परिसर पिंजून काढत आहेत.
सांगली जिल्ह्यात ‘महाडिक पॅटर्न’ची मोठी चर्चा असते. ‘पक्ष’ हा प्रश्नच महाडिक यांना नाही. तशी काहीशी अवस्था नानासाहेब महाडिक त्यांचे पुत्र राहुल आणि सम्राट यांची आहे. वनश्री पतसंस्थेच्या विविध शाखा कार्यरत झाल्या आहेत. पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य पानपट्टीधारक, चहाटपरी, छोटे व्यावसायिक, महिला बचत गट यांना मोठा अर्थपुरवठा केला आहे. परिसरातील सुमारे २५०० हून जादा महिला बचत गटांना अर्थसाहाय्य केले आहे. त्यामुळे लोकांपर्यंत राहुल महाडिक यांचे नाव पोहोचले आहे. विधानसभेसाठी ‘कोरी पाटी’ म्हणून ते चर्चेत आहेत. पण ते यावेळी तरी प्रत्यक्ष रिंगणात उतरणार, की कोणाला पाठिंबा देणार, हा प्रश्न आहे.
मिरज पश्चिम भाग इस्लामपूर विधानसभेला जोडल्यापासून या परिसरातील जनतेला जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे आकर्षण आहे. राजारामबापू साखर कारखाना, विविध उद्योग समूह, बँक या माध्यमातून भागाच्या विकासाबाबत मोठा आशावाद होता. पण सार्वजनिक विकास कामांबाबत मोठी कामे गावोगावी मंत्री असताना जयंत पाटील यांनी केली. त्या माध्यमातून परिसरातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, बुधगाव या ग्रामपंचायतीत सत्तेत सहभाग राष्ट्रवादीला मिळाला आहे. जयंत पाटील यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत. मागे पडलेली राष्ट्रवादी हल्लाबोलच्या माध्यमातून रिचार्ज झाली. इस्लामपूरच्या सभेला या भागातून मोठी गर्दी झाली होती.
सदाभाऊ खोत मंत्री झाल्यापासून इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी या भागात संपर्क फेऱ्या वाढल्या आहेत. ते विधानसभा लढविणार का, ही चर्चा आहे. सध्या भाजपमधून त्यांचे नाव येत आहे. पण सदाभाऊ खोत की निशिकांत पाटील, हा प्रश्न आहे. पण जयंत पाटील यांच्या प्रस्थापित राजकारणात सर्व विरोधक एकत्र येणार का, हाच मोठा प्रश्न आहे. नाही तर जयंत पाटील यांचे राजकारण पुन्हा घट्ट होणार आहे. राहुल महाडिक शेवटपर्यंत निवडणूक रिंगणात राहणार का, याबाबत चर्चा आहे.