भाजपला पाठिंब्यावरून मिरजेत काँग्रेसमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 08:56 PM2019-10-02T20:56:53+5:302019-10-02T22:04:58+5:30
गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. भाजप व सुरेश खाडे यांना आमचा विरोध कायम असून, कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची भूमिका निष्ठावंत गटाने घेतली आहे.
मिरज : मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देण्यावरून कॉँग्रेसच्या मदन पाटील गटात फूट पडली आहे. मिरज पूर्व भागातील मदन पाटील गटाने मिरजेत मेळावा घेऊन भाजपचे उमेदवार, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, या निर्णयास विरोध करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा पवित्रा घेतला आहे.
मिरज तालुक्यातील काही गावांमध्ये ग्रामपंचायती व विविध सहकारी संस्थांमधे मदन पाटील गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. पक्षाची पिछेहाट झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेससमोर अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हान आहे. गेली पाच वर्षे खाडे यांच्याविरुद्ध संघर्ष करणारे काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे, माजी सभापती खंडेराव जगताप, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी वा-यावर सोडल्याची तक्रार करीत निवडणूक जाहीर झाल्यानंतर मिरजेत मेळावा घेऊन सुरेश खाडे यांना पाठिंबा दिला होता.
मात्र, हा निर्णय मिरज पूर्व भागातील कॉँग्रेसच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पटला नाही. त्यांनी यास विरोध दर्शविला आहे. भाजप व सुरेश खाडे यांना आमचा विरोध कायम असून, कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची भूमिका निष्ठावंत गटाने घेतली आहे.
गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने संघर्ष सुरू असताना, काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, म्हणून खाडेंना पाठिंबा देणे, हे योग्य नाही. भाजपची विचारसरणी पटणारी नसल्याचे पक्षासोबत कायम असल्याचे मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती वसंतराव गायकवाड यांनी सांगितले. काँग्रेस अडचणीत असताना पक्षाकडे पाठ फिरविणे योग्य नाही. खाडेंना पाठिंबा देण्याचा काहींचा निर्णय हा वैयक्तिक आहे. मदन पाटील गट किंवा कॉँग्रेसचा या निर्णयाशी संबंध नाही, असे पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे यांनी सांगितले.