मिरज : मिरजेत उरूसानिमित्त मीरासाहेब दर्ग्यास चर्मकार बांधवांचा मानाचा गलेफ भक्तिभावाने अर्पण करण्यात आला. मानाच्या गलेफानंतर उरूसास उत्साहात प्रारंभ झाला. उरूसानिमित्त दर्ग्यास आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस दि. ३ मे रोजी सुरुवात होणार आहे. किराना घराण्याचे दिग्गज गायक-वादक संगीत सभेस हजेरी लावणार आहेत. मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त गुलबर्गा येथील सुफी संतांच्या उपस्थितीत गंधलेप विधी पार पडला. उरूसाच्या पहिल्यादिवशी (दि. २ मे) चर्मकार बांधवांचा मानाचा गलेफ तानाजी सातपुते, आनंदा देवमाने, दीपक सातपुते, रघुनाथ सातपुते, अल्लाबक्ष काझी, अण्णासाहेब कुरणे, मीरा सातपुते, नगरसेवक भैय्या सातपुते यांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आला. उरूसाच्या मुख्य दिवशी पहाटे मानाचा गलेफ अर्पणानंतर शासनाचा गलेफ, गंधरात्र व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर ‘महफिले समा’ हा कव्वाल्लीचाही कार्यक्रम पार पडला. रऊफ बंदानवाजी व नईम अजमेरी यांनी कव्वाली सादर केली. दर्गा सरपंच अब्दुलअजिज मुतवल्ली व गुलबर्ग्याचे सुफीसंत उपस्थित होते. दि. ३ रोजी संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत सभेची सुरुवात होणार आहे. उरूसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनी स्टेशन ते मार्केट चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत. उरूसानिमित्त शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर्ग्यास विद्युत रोषणाईचा साज चढविण्यात आला आहे. (वार्ताहर)वाहतुकीत बदल : पर्यायी मार्गांचा वापर, पार्किंगची सोयमिरजेत उरूसानिमित्त मिरज मार्केट बस स्टॉप ते स्टेशन चौक रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मार्केटकडे येण्यासाठी ही वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली आहे. मिरजेतील मीरासाहेब उरूस दि. २ ते २० मेपर्यंत साजरा होत आहे. उरूसानिमित्ताने मिरज मार्केट ते स्टेशन चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूस विक्रेत्यांनी स्टॉल उभे केल्याने वाहतुकीस कोंडी होऊ नये तसेच वाहनांमुळे जीवितास धोका पोहोचू नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसप्रमुखांच्या आदेशनुसार मिरज मार्केट ते स्टेणन चौक, गुरुवार पेठ ते मटण मार्केट, सांगली वेस ते मुजावर गल्ली, मटण मार्केट ते दर्गा कमान या वाहतुकीत वाहतूक नियंत्रण शाखेने बदल केला आहे. मिरज मार्केटकडे येणारी वाहतूक अण्णा भाऊ साठे पुतळा, बसवेश्वर चौक, सिध्दार्थ चौक मार्गे मार्केट व शाहू चौक ते मार्केट अशी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसास प्रारंभ
By admin | Published: May 02, 2016 11:40 PM