सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मिरजेशी नाते राहिले. महारवतन जमिनी आणि दलितांवर तत्कालीन व्यवस्थांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी संघर्ष करताना, मिरजेतील दलितांमध्ये जागृतीचे काम केले. २ नोव्हेंबर १९४१ रोजी त्यांनी मिरजेतील तक्का (नदीवेस) येथे यासंदर्भात सभा घेतली होती. त्यानंतरही रेल्वे प्रवासादरम्यान मिरज स्थानकावर अनेकदा कार्यकर्त्यांना ते भेटले होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिल्ह्याशी असलेला संबंध मिरज आणि परिसरापुरता मर्यादित होता. कळंबी येथील दादासाहेब इनामदार यांच्याही ते संपर्कात होते. इनामदार व बाबासाहेबांमध्ये अनेकदा पत्रव्यवहारही झालेले आहेत. पुणे येथील सिम्बॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयात असलेल्या पत्रांमध्ये यासुद्धा पत्रांचा समावेश आहे. दलित चळवळ आणि परिसरातील कामांबाबत इनामदार यांच्याशी ते संपर्कात होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडील माहितीनुसार, नोव्हेंबर १९४१ मध्ये ते सांगलीला वकील म्हणून एका केससंदर्भात आले होते. फौजदारीची ही केस होती. सांगलीतील काम आटोपल्यानंतर ते मिरजेला आले. मिरजेतील तक्का परिसरात त्यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी ‘महारवतन’ या विषयावर भाषण केले होते. दलितांमध्ये यासंदर्भात जागृती होण्यासाठी त्यांनी जी चळवळ हाती घेतली होती, त्या चळवळीला मिरजेतील या सभेचाही स्पर्श झाला होता. तत्कालीन संस्थानांशीही बाबासाहेबांनी वतन जमिनींबाबतच्या अडचणींबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र यासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे इतिहास संशोधक मंडळाने सांगितले. बाबासाहेब यांनी ज्यावेळी स्वतंत्र कामगार पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी) ची स्थापना केली होती. त्यावेळी निवडणुका लढविताना ते महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही गावांमध्येही सभांसाठी गेले होते. निपाणी व परिसरात तसेच सीमेवरील कर्नाटकमधील काही गावांमध्ये ते गेले होते. अशावेळी रेल्वे प्रवासादरम्यान ते नेहमी येथील स्थानकावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबत असत. त्यामुळे यानिमित्तानेही सातत्याने अनेकदा मिरजेशी त्यांचा संपर्क झाला. याठिकाणच्या पाऊलखुणा आजही सर्वच घटकांना प्रेरणादायी ठरत आहेत. मिरजेतील शास्त्री चौक व तक्का परिसरात आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम होतात. हा परिसर बाबासाहेबांच्या पाऊलखुणांनी ऐतिहासिक बनला आहे. नव्या पिढीतील अनेकांना याची कल्पना नसली तरी, निश्चितच संपूर्ण शहराला पुढील अनेक काळ हे स्थान पे्ररणा देत राहील. (प्रतिनिधी)
मिरजेत बाबासाहेबांच्या पाऊलखुणा...
By admin | Published: April 13, 2016 10:36 PM