दत्ता पाटील
तासगाव : तासगाव तालुक्यात कोरोनाकाळात वाटप करण्यात आलेल्या मोफत धान्याच्या कमिशन वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने एका विशेष वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले खरे, मात्र महिन्याभरानंतरदेखील चौकशीची प्रक्रिया ‘जैसे थे’च आहे. परिणामी गैरव्यवहाराच्या कारवाईला खो बसल्याची चर्चा आहे.
कमिशनच्या रकमेवरून सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि सेल्समन यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये सेल्समननी राजीनामा दिला आहे, तर अनेक संस्थांनी रक्कम आपल्या खात्यावर जमा करावी, यासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र आजअखेर संस्थांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.
तासगाव तालुक्यात कोरोनाकाळात जनतेला मोफत गहू आणि तांदूळ वाटप करण्यात आले होते. प्रतिकिलो दीड रुपयाप्रमाणे यासाठी केंद्र सरकारने कमिशन दिले आहे. याचे वाटप करताना सहकारी संस्थांना अंधारात ठेवून प्रशासनाला हाताशी धरून संस्थांना मिळणारे कमिशन सेल्समनच्या नावे जमा करण्यात आले होते. यामुळे संस्थाना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. ‘ लोकमत’मधून हा गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, सेल्समननी दिलेल्या २५ टक्के रकमेबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे सेल्समनना संस्थेने कमिशन रक्कम तत्काळ जमा करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र कमिशनच्या २५ टक्के रकमेबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. सेल्समननीच २५ टक्केचा भुर्दंड सोसायचा का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत रीतसर तक्रार नसल्याने प्रशासनानेही याकडे डोळेझाक केली आहे.
धान्यवाटपातील गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी संस्था आणि सभासदांकडून होत आहे.
विषय संपवून टाकण्याचा अजब सल्ला
काही दिवसांपूर्वी तासगाव तहसील कार्यालयाच्या आवारात संस्थांचे अध्यक्ष व सेल्समन यांची बैठक झाली. यावेळी चौकशी करून दोष निश्चित करण्याऐवजी, संस्था आणि सेल्समन यांनी स्थानिक पातळीवर विषय संपवून टाकावा, असे सांगितल्याची चर्चा आहे. एक महिना झाला तरी आजपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधितांना नोटीस काढून खुलासा मागविल्याचे सांगितले.