लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर कोणी गैरवर्तन करत असेल तर ते खेपवून घेतले जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिला आहे. काही गावांत कर्मचाऱ्यांना दमदाटी व धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी आल्याने त्यांनी हा इशारा दिला.
कडेगाव तालुक्यातील बोंबाळेवाडीसह अन्य काही तालुक्यांतून तक्रारी आल्याचे कोरे म्हणाल्या. गेल्या सव्वा वर्षांपासून अथकपणे राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. असा त्रास झाल्यास काम करणे शक्य नसल्याचे कळविले आहे. त्यावर कोरे म्हणाल्या की, जिल्हा प्रशासन संपूर्ण ताकदीने कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी कोणत्याही तक्रारीसाठी थेट संपर्क साधावा. कोरोना नियंत्रणावर लक्ष केंद्रित करावे. चाचण्या, सर्वेक्षण, संशयितांचे विलगीकरण किंवा रुग्णालयात दाखल करणे ही कामे सूचनांनुसार करावीत. चाचण्यांना, विलगीकरणाला कोणी विरोध करत असेल तर त्याची कल्पना वरिष्ठांना द्यावी.
त्या म्हणाल्या की, कोरोना रोखण्याची जबाबदारी कोरोना योद्ध्यांबरोबरच लोकांचीही आहे. त्यांनी यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी जिवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांच्याशी कोणी गैरवर्तन करू नये. सर्वेक्षण व चाचण्यांना सहकार्य करावे, अन्यथा प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावोगावी संस्थात्मक विलगीकरणाची सोय करावी. आपले गाव, आपली जबाबदारी या भावनेने कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेचे प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल.
चौकट
लसीसाठीही ग्रामस्थ आक्रमक
कोरोनाच्या लसीसाठीही आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. लसीचा पुरवठा अत्यल्प होत असल्याने सर्वांनाच लस मिळणे मुश्कील झाले आहे. मात्र, काही गावांत ग्रामस्थांकडून लसीसाठी गैरमार्ग अवलंबले जात आहेत. कर्मचाऱ्यांनी त्याची माहिती द्यावी, संबंधितावर कायदेशीर कारवाई करू, असे प्राजक्ता कोरे म्हणाल्या.