सांगली : शहरातील गंजीखान्याची जागा कायदेशीरदृष्ट्या गणपती पंचायतन संस्थानच्या मालकीची आहे. तरीही या जागेसह अन्य काही जागांबाबत महापालिका, पदाधिकारी, नगरसेवक वारंवार दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संस्थानच्या कोणत्याही जागेबाबत अशी माहिती दिल्यास किंवा त्यावर कोणत्याही योजना आखल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने काळीखण, जुना जनावरांचा बाजार, गंजीखाना अशा विविध जागांबाबत दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. श्री गणपती पंचायतन संस्थान कायदा १९४० मधील कलम २० व १९ ब प्रमाणे विशेषत: त्याच्या सर्व मिळकतीवर संस्थानच्या उत्तराधिकारी म्हणून माझा हक्क स्पष्ट होतो.
परंतु महापालिकेची सत्ता हाती आली म्हणून पंचायतन संस्थानच्या जागेवर
बेकायदेशीर कब्जा घेणे व त्यावर वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून भूलभुलैया तयार केला जात आहे.
गणपती पंचायतन संस्थानला कोणत्याही भूसंपादन कायद्यातील तरतुदी लागू होत
नाहीत. त्याबाबत न्यायालयात केसेसही सुरू आहेत. गंजीखान्याच्या जागेबाबतही मुंबई उच्च न्यायालयाने दि. ९ जुलै १९९९ चा मनाई हुकूम केला आहे आणि १० ऑक्टोबर १९७४ चा निकालही पंचायतनच्या बाजूने झाला आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंजीखान्याची जागा
स्वच्छ करीत असल्याबाबत महापालिकेने ताेंडी कळविले होते. त्यानंतर
आम्ही १५ जानेवारी २०२१ रोजी अभियानास सहकार्य राहील, असे लेखी पत्र
महापालिकेस पाठवून त्याची पोहोच घेतली होती. असे असताना या जागेबाबत खोटी
माहिती पसरविण्यात आली. वास्तविक माळबंगल्याची जागा जेव्हा तत्कालीन
आयुक्तांच्या मागणीनुसार सार्वजनिक योजनेस पंचायतन संस्थानने दिली
तेव्हा ती रीतसर कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करून दिली होती. त्यामुळे
कोणत्याही ताेंडी, लेखी पत्राचा आधार घेऊन चुकीची माहिती पसरविण्याचे
उद्योग कुणी करू नयेत.
महापालिकेने स्वत:च कबूल केले आहे की, मंजूर विकास आराखड्यात गंजीखाना जागेवरील म्हणजेच श्री गणपती पंचायतन संस्थानच्या जागेवरचे आरक्षण उठले आहे. यावरून ही मिळकत पंचायतन संस्थानच्या मालकीची आहे त्यामुळे या जागेवर कोणत्याही योजना आखण्यात येऊ नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा पटवर्धन यांनी दिला आहे.