मगदूम म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजना गतीने मार्गी लागली पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहाेत. आमच्या वेळी ही योजना १५० कोटींची होती, आता ती २५० कोटींची कशी झाली, याचे उत्तरही सूर्यवंशी यांनी द्यावे. या योजनेचा डीपीआर अद्याप अपूर्ण आहे. २४ टक्केच डीपीआर पूर्ण झाला आहे. उर्वरित ७५ टक्के डीपीआर अपूर्ण आहे. तरीही आठवडाभरात प्रस्ताव कसा सादर करणार, हे न उलगडणारे काेडे आहे.
प्रस्ताव करताना कुपवाडमधील सर्व नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कोणत्या भागात ड्रेनेज लाइन नाही याची कल्पना असते, त्यामुळे असा भाग डीपीआरमध्ये समाविष्ट केला पाहिजे. अन्यथा सांगली व मिरजेसारखी कुपवाड ड्रेनेजची अवस्था होईल. मिरजेत ड्रेनेज योजना सुरू आहे. मात्र, या योजनेत शहरातील अनेक भागांचा समावेशच नाही. त्यामुळे तेथील नागरिक नाराज आहेत. अशी स्थिती कुपवाडमध्ये होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
मगदूम म्हणाले, या योजनेसाठी कुंभार मळा येथे प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र, ही जागा अद्याप महपाालिकेने खरेदी केलेली नाही, तसेच या जागेतून ओढा जातो, त्यामुळे येथे प्रक्रिया केंद्र कसे उभारणार, हाही प्रश्न आहे. महापौरांनी या योजनेचा आधी अभ्यास करावा, माहिती घ्यावी. घाईगडबडीत शासनाला प्रस्ताव सादर न करता नगरसेवकांना विश्वासात घेऊन परिपूर्ण प्रस्ताव तयार करावा.