अविनाश कोळीसांगली : रुग्णावरील उपचार जेवढे महत्त्वाचे असतात, तितकेच ते रुग्णालयाच्या व्यवस्थापनातही असतात. मिशन हॉस्पिटलचे व्यवस्थापन एकेकाळी अत्यंत निरोगी होते. व्यवस्थापन करणाऱ्या काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे, स्वार्थी वृत्तीमुळे येथील व्यवस्थापनाचे आरोग्य ढासळले. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी थकीत पगाराचा विचार न करता नोकऱ्या सोडल्या. दुसरीकडे हताश कर्मचारी व्यवस्थापनाकडे आता विचारणा करताहेत, कुणी पगार देता का पगार?गैरव्यवस्थापनामुळे वैद्यकीय क्षेत्रातला हा मोठा डोंगर खचला. तज्ज्ञ डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी सोडलेली साथ, माफक दरातील उपचारापासून वंचित राहिलेले रुग्ण, धूळ खात असलेल्या इमारती, यंत्रसामग्री यामुळे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. ज्यांनी गैरव्यवस्थापन करून हात धुवून घेतले ते आता नामानिराळे झाले आहेत. गैरव्यवस्थापनाबाबत ना कोणाला जाब विचारला गेला, ना कोणाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे पडझड रोखण्याऐवजी ती जितकी मोठ्या प्रमाणावर होईल तितकी होऊ दिली गेली.
डॉक्टरांचे पगार अडीच वर्षांपासून थकीतडॉक्टरांचे पगार गेल्या अडीच वर्षांपासून तर द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार वर्षभरापासून थकीत आहेत. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही भरण्यात आलेला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कर्मचाऱ्यांचे मोठे खच्चीकरण झाले आहे.
रुग्णसंख्या वीस-पंचवीसवरकधीकाळी येथील पाचशे खाट रुग्णांनी भरूनही नित्य उपचार (फॉलोअप)साठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही दोनशेच्या वर होती. केवळ मेंदुविकार विभागातच दररोजची ओपीडी ९० रुग्णांची होती. आता या रुग्णालयात केवळ २० ते २५ रुग्ण तपासणीसाठी येत असतात.
अनेक विभागांना टाळेडॉक्टर, कर्मचाऱ्यांअभावी अनेक विभागांना सध्या टाळे लागले आहेत. कधीकाळी गजबजलेल्या रुग्णालयातील यंत्रणा आता धूळ खात असल्यामुळे रुग्णालय भकास वाटू लागले आहे.
कपडे धुवायचे तरी कोठून?रुग्णांचे कपडे, बेडशिट्स, पडदे आदी कापडी साहित्य धुण्यासाठी रुग्णालयात एक स्वतंत्र विभाग आहे. या ठिकाणी सुमारे २० अजस्त्र यंत्रे आहेत. अमेरिकेतून ही यंत्रे आणली आहेत. पूर्वी दिवसभर या यंत्रांचा आवाज घुमायचा. आता रुग्णसंख्याच तुरळक असल्याने यंत्रे शांत झाली आहेत. धुवायलाही आता कपडे नाहीत.
औषध दुकाने ओस
पूर्वी येथील दोन औषध दुकानांतून औषध घेण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या असत. दररोज अडीच ते तीन लाखांची उलाढाल व्हायची. आता महिन्यालाही तेवढी उलाढाल होणे मुश्कील झाले आहे.