अविनाश कोळी सांगली : उत्तर प्रदेशमधील मथुरेच्या एका गर्भवती महिलेला व तिच्या पोटातील बाळाला तासगाव (जि. सांगली) व शिर्डी (जि. अहमदनगर) येथील दोन तरुणांनी जीवदान दिले. दुर्मीळ रक्तगटाच्या या दोन्ही रक्तदात्यांनी तातडीने केलेल्या मदतीने उत्तर प्रदेशवासीयांची मने जिंकली.पूनम शर्मा (२५, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेस आग्राजवळील कमलानगरमध्ये बीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिची प्रकृती चिंताजनक होती. तिला तातडीने रक्तपुरवठा करण्याची गरज होती. महिलेची व बाळाची रक्त तपासणी केल्यानंतर त्यांचा ‘बॉम्बे ओ’ हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट असल्याचे दिसून आले. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये शोधाशोध करूनही या गटातील रक्त उपलब्ध झाले नाही. सोशल मीडियावर याबाबतीत एक संदेश व्हायरल करण्यात आला. तो फिरत फिरत तासगावच्या विक्रम यादव यांच्या ग्रुपवर आला.विक्रम यादव हे स्वत: ‘बॉम्बे ओ’ या दुर्मिळ रक्तगटातील असून, त्यांनी संपूर्ण महाराष्टÑात आणि अन्य राज्यांमध्ये या दुर्मिळ रक्तगटाची मोठी चळवळ उभी केली आहे. त्यामुळे त्यांनी या मेसेजची दखल घेत संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधला. यादव यांनी शिर्डी येथील संबंधित रक्तगटातील रवी आष्टेकर यांना संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी दीड हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या १३ तासांत पार करीत दोन जीव वाचविले.पदरमोड करून दान : विक्रम यादव यांनी तासगाव ते पुणे एसटीने आणि पुण्यातून दिल्लीपर्यंत विमानाने प्रवास केला. त्यांनी ३२ हजार रुपयांची पदरमोड केली. संबंधित महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्याकडून त्यांनी एकही रुपया घेतला नाही.काय आहे ‘बॉम्बे ओ? : ‘बॉम्बे ओ’हा रक्तगट सर्वात दुर्मिळ आहे. जगभरात याचे प्रमाण 0.000४ टक्के आहे. भारतात या रक्तगटाच्या केवळ १७९ व्यक्तीच आढळल्या आहे. पश्चिम महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईतील डॉ.वाय.एम.भेंडे यांनी १९५२ मध्ये या रक्तगटाचा शोध लावला होता.
महाराष्ट्रातील दोघांनी दिले मथुरेच्या गर्भवतीला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 6:21 AM