सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने २७ फेब्रुवारी तलाठी व लिपिक परीक्षा पेपरच्या चुकीच्या पद्धतीने स्क ॅनिंग करुन खोटे निकालपत्र तयार केल्याप्रकरणी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि. (एमकेसीएल)चे महाव्यवस्थापक मोहन ठोंबरे (रा. पुणे) व त्यांच्या सहकार्यांवर आज (गुरुवार) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रभारी महसूल तहसीलदार शामराव राजाराम सावंत यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, लिपिक, टंकलेखक व तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी २७ फेब्रुवारी २०१४ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका स्कॅनिंग करुन व ती पाठविण्याची जबाबदारी एमकेसीएल या कंपनीकडे होती. कंपनीने या निकालपत्रकात गोंधळ घालून उमेदवारांबरोबर प्रशासनाची फसवणूक केली आहे. प्रशासनाने या कंपनीसोबत लेखी करार केला असताना उमेदवारांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे स्कॅनिंग चुकीच्या पद्धतीने करुन वास्तवापेक्षा खोटे निकालपत्र तयार करुन जिल्हा प्रशासनाचा व उमेदवारांचा विश्वासघात केला आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासनाच्या लौकिकाचे नुकसान व्हावे या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले आहे. वास्तवापेक्षा चुकीच्या वेगळ्या व खोट्या गुणपत्रिका बनावटरित्या बनवून त्या बनावट गुणपत्रिकेचा तपशील हा खरा आहे म्हणून त्याचा वापर करुन चुकीच्या गुणपत्रिकेची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करुन उमेदवारांची दिशाभूल केली आहे. याप्रकरणी एमकेसीएल महाव्यवस्थापक मोहन ठोंबरे व त्यांचे सहकारी हे जबाबदार असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा प्रशासनाने उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
एमकेसीएल कंपनीवर गुन्हा खोटे गुणपत्रक केले : तलाठी, लिपिक परीक्षेत गोंधळ
By admin | Published: May 09, 2014 12:10 AM