सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले. मात्र सांगलीतील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर गुवाहाटीला गेले नाहीत. यामुळे बाबर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आमदार बाबर यांनी स्पष्टीकरण दिले.आमदार बाबर म्हणाले की, सरकार स्थापनेच्या घडामोडीवेळी माझी पत्नी आजारी पडली. तिचे त्या आजारपणात निधन झाले. आता २७ नोव्हेंबररोजी तिचा जन्मदिवस असून, आमच्या घरी घरगुती कार्यक्रम आहे. अशा परिस्थितीत भावनेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मी हा दौरा रद्द केला. या दौऱ्याला मी गेलो नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी नाराज आहे. मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कोठे जायला मिळाले अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा मी माणूस आहे.लोकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणाराच लोकप्रतिनिधी असतो. नाराजीचा विषय म्हटला तर तो विकास कामासाठी होऊ शकतो. मी सत्तेसाठी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी मलासुद्धा भावना आहेत. भावनिक स्तरावर काम करत असताना मलाही कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी लावणे महत्त्वाचे ठरते. माझा स्वभाव कुटुंबवत्सल आहे. त्यामुळे कुटुंबाच्या भावना जपण्यासाठी मी त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही. त्यामुळेच मी या दौऱ्यावर गेलो नाही. कृपया याचा अर्थ मी नाराज आहे, असा कोणी काढू नये.
शिंदे गटातील आणखी एका आमदाराची गुवाहाटीला जाण्यास गैरहजेरी, म्हणाले..
By श्रीनिवास नागे | Published: November 26, 2022 2:09 PM