अशोक डोंबाळेसांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात पाणी आणल्यामुळे पीक हिरवीगार झाली. पण, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाला मंत्रीपद मिळवून तोही दुष्काळ हटवायचा आहे, अशी भूमिका आमदार अनिल बाबर नेहमी मांडायचे. त्यांना महाविकास आघाडी आणि महायुती सरकारमध्ये चारवेळा मंत्रीपद निश्चित झाल्यानंतर अचानक हुलकावणी दिली. अखेर बुधवार दि.३१ जानेवारीला सकाळी अनिल भाऊंची प्राणज्योत मालवल्याची वृत्त येताच कार्यकर्ते सुन्न झाले. सोशल माध्यमावर कार्यकर्त्यांकडून भाऊंचे मंत्रिपदाचे स्वप्न अपूर्णच राहिल्याच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. अंत्यसंस्कारच्या ठिकाणीही या आठवणीने कार्यकर्त्यांना हुंदका आवरने ही कठीण झाले.काँग्रेस फुटून राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यावेळी अनिल भाऊ यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९९ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आले. शरद पवार यांनी अनिलभाऊ यांच्याकडे मंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मोठ्या मनाने अनिलभाऊ यांनी मी पुन्हा आमदार होऊ शकतो. पण, आर. आर. पाटील यांना राजकीय अडचणी खूप असल्यामुळे त्यांना संधी देण्याची विनंती केली. स्वत:हून भाऊ यांनी आर. आर. पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली होती.पण, त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये अनिलभाऊंनी विजय खेचून आणला. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविली आणि विजयीही झाले. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार येण्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. अनिलभाऊ यांना निश्चित मंत्रीपद मिळणार, असा निरोप 'मातोश्री'वरून आला होता. त्यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तयारी करून कार्यकर्त्यांसह भाऊ मुंबईला गेले. पण, अचानक 'मातोश्री'वर कुणी तरी मिठाचा खडा टाकला आणि भाऊंचे मंत्रीपद हुकले.
राज्यात शिवसेना बंडखोर आमदारांचा गट व भाजप यांचे सरकार स्थापन झाले. यावेळी अनिलभाऊ यांचे मंत्रीपद निश्चित होते. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे निधन झाले. या दु:खद घटनेमुळे त्यांनी मंत्रीपद स्वीकारले नाही. पुढे विस्तारात अनिलभाऊ यांना मंत्रीपद निश्चित मिळेल, अशी अपेक्षा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्यामुळे ते मंत्री निश्चित असणार, अशी कार्यकर्त्यांसह जिल्ह्यात चर्चा होती.शिवसेनेकडून बाबर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. पुन्हा संधी मिळणार आहे, अशी कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना भाऊंनी शांत केले. अनिलभाऊ यांनी खानापूर-आटपाडी तालुक्याला टेंभूचे पाणी देऊन दुष्काळ हटविला. पण, खानापूर-आटपाडी तालुक्यांचा मंत्रीपदाचा दुष्काळ हटविण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.शोभाताईंचेही स्वप्न अपूर्णचराज्यात जून २०२२ मध्ये शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाले. अनिलभाऊ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांना विस्तारात १०० टक्के मंत्रिपदाची संधी मिळणार, अशी चर्चा मतदारसंघात सुरू होती. याच दर ऑगस्ट २०२२ मध्ये भाऊंच्या पत्नी शोभाताई यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना पुण्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निश्चित केले. घरातून बाहेर पडताना शोभाताईंनी सुनबाईंना अगं माझ्या बॅगमध्ये एखादी चांगली साडीही ठेव. कदाचित मला भाऊंच्या मंत्रिपदाच्या शपथविधीला जावे लागणार आहे. पण, त्यांचे हे शब्द अधुरेच राहिले. रुग्णालयात अचानक प्रकृती खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.