आमदार अपात्र निकाल: पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं, नार्वेकर यांचा निर्णय...
By अशोक डोंबाळे | Published: January 8, 2024 06:35 PM2024-01-08T18:35:10+5:302024-01-08T18:36:48+5:30
नेते गेले, लोक इंडिया आघाडीकडे
सांगली : पक्षांतर बंदी कायद्याचे राज्यात उल्लंघन झालं आहे, मात्र ते कोणी मान्य करायला तयार नाहीत, न्यायालयाने सांगून देखील विलंब लावला जातोय, आता १० तारखेची मुदत दिली आहे, यावेळी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय राजकीय असेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदारपृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, न्यायालयाने मुदत दिलेली असल्याने नार्वेकर यांना निर्णय घ्यावाच लागेल, मात्र ते विधानसभेचे अध्यक्ष असले तरी एका पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय पूर्णतः राजकीय निर्णय असेल हा माझा विश्वास आहे, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय काही निर्णय घेईल का ? हे पाहावे लागणार आहे. निवडणुकीचे गणित साधे आहे, २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के तर २०१९ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते. बालकोट प्रकरणामुळे २०१९ ला मते वाढली होती. आता तसे वातावरण नाही.
राजीव गांधी यांनीच प्रथम राम मंदिराचे दरवाजे उघडले
राम मंदिराच्या बाबतीत राजीव गांधी यांनीच प्रथम मंदिराचे दरवाजे उघडले होते. मात्र न्यायालयाकडून ज्यांना जमीन मिळेल, त्यांना समर्थन काँग्रेस करेल अशी भूमिका होती, तीच आहे. सध्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभा राहत असून त्याचा आम्हाला आनंद आहे. पण निवडणुकीत रोजगार, महागाई, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे त्यांची मते ३४ टक्केच असणार आहेत. उर्वरित सर्व घटक पक्षांना एकत्रीत करुन ६६ टक्के मते खचून एकास एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी धोरण निश्चित केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आमचेच आहेत. पण, अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनाही बरोबर घेतले आहे. वंचित, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही इंडिया आघाडीबरोबरच असणार असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व वसंतदादा सहकारी साखर करखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..
- ईडीच्या माध्यमातून दहशत, धमक्या देण्याचा प्रयत्न
- मराठा आंदोलकाना सरकारने योग्य वागणूक द्यावी, अन्यथा गंभीर परिणाम
- ओबीसी विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचे काम सध्या सुरू
- ईव्हीएम यंत्राबाबत मतदारांना शंका असल्यामुळे बऱ्याच देशांनी नाकारले आहे. लोकांना शंका असेल तर पेपर बेस निवडणुका व्हाव्यात.
- प्रामाणिकपणे लढणार असाल, तर वंचितने इंडिया आघाडीशी चर्चा करावी, केवळ मीडियात बोलून काही होणार नाही.
- लोकशाही धोक्यात आली आहे. रशियात पुतीनने केले, चीनमध्ये सद्या जे चालले आहे, ते आता भारतात होईल की काय अशी भीती वाटू लागलीय.