मिरज : मिरजेत बसस्थानकाजवळ अमर थिएटर समोर असलेल्या वादग्रस्त जागेबाबत कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही गटांना बुधवारी आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद यांनी जागेच्या मालकीचा दावा केला. प्रकरणाची पुढील सुनावणी दि. १९ जानेवारी रोजी होणार आहे. आज, बुधवारी सकाळी तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर या प्रकरणाची दुसरी सुनावणी झाली. सुनावणीस वहिवाटदारांपैकी चौघे गैरहजर होते. ब्रह्मानंद पडळकर यांच्यातर्फे हजर झालेले वकील एच. आर. मुल्ला यांनी जागेच्या मालकीचा दावा केला. कोणताही एकतर्फी निर्णय होऊ नये म्हणून पडळकर यांनी न्यायालयात कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. कब्जेदारांतर्फे ए. ए. काझी, समीर हंगड, नितीन माने यांनी बाजू मांडली.दोन्ही गटांकडे जागेच्या मालकीबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. कागदपत्रे उपलब्ध करण्यात अडचणी येत असल्यामुळे दोन्ही गटाच्या वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावर तहसीलदारांनी आणखी एका आठवड्याची मुदतवाढ देऊन पुढील सुनावणी दि. १९ रोजी होईपर्यंत वादग्रस्त जागेत ‘जैसे थे’ परिस्थितीचे आदेश दिले.दोन्ही गटांकडून न्यायालयीन डावपेचमिरजेतील संबंधित वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी पोकलॅनद्वारे दहा दुकाने रातोरात उद्ध्वस्त केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जागा मालकीचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाल्याने दोन्ही गटांकडून न्यायालयीन डावपेच सुरू आहेत.
मिरजेतील वादग्रस्त जागेवर आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाचा दावा, सुनावणी पुन्हा लांबणीवर
By श्रीनिवास नागे | Published: January 11, 2023 4:31 PM