सांगली : आटपाडी येथे गेल्या आठवड्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडीवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. याप्रकरणी आमदार पडळकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी यावर सुनावणी झाली. या प्रकरणात दुसऱ्या गटाचे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांना बुधवारी जामीन मंजूर झाला होता.
गेल्या आठवड्यात दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला होता. या प्रकारानंतर दोन्ही गटाच्या प्रत्येकी १६ जणांवर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड करत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार पडळकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, जिल्हा न्यायालयाने तो नामंजूर केला होता. यावर पडळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर सुनावणी होत पडळकर यांना जामीन मंजूर झाला आहे.