दिघंची : झरे (ता. आटपाडी) येथे बैलगाडी शर्यत होऊ देणार नाही असे म्हणणाऱ्या प्रशासनाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुंगारा देत वाक्षेवाडीच्या माळरानावर शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान शर्यत पार पाडली. शर्यतीसाठी राज्याच्या विविध कोनाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने तरुण व शेतकरी आले होते.
बैलगाडा शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. संपूर्ण आटपाडी तालुक्यात नाकाबंदी केली होती; तर झरेसह नऊ गावांत संचारबंदी लागू केली होती. शर्यतीस बंदी असल्यामुळे शर्यतीच्या आयोजनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे शर्यत कशी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शर्यतीसाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे झरे येथे हजर झाले होते.
आमदार पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीसाठी स्वतःच्या फार्म हाऊसशेजारी मैदान तयार केले होते. प्रशासनाने गुरुवारी मैदानावर जेसीबीच्या साहाय्याने चरी मारून मैदान उद्ध्वस्त केले; परंतु पडळकर समर्थकांनी रात्रीत वाक्षेवडीच्या माळरानावर दुसरे नवीन मैदान तयार करून शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान शर्यती घेतल्या. यामध्ये सात बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. शर्यती पार पडल्यानंतर पडळकर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
आमदार पडळकर मात्र शर्यतीच्या वेळी हजर नव्हते. शर्यती पार पडल्यानंतर आमदार पडळकर मैदानावर हजर झाले. यावेळी पोलीस प्रशासनाशी कोणताही वाद न घालता आपापल्या घरी जाण्याचे आवाहन आमदार पडळकर यांनी केले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्यभर आंदोलन उभा करू, त्यासाठी शेतकरीवर्गाने साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.