Jayant Patil ( Marathi News ) : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जानेवारी महिन्यात झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिष्टमंडळासमवेत सहभागी झाले होते. मात्र आता या दौऱ्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी तिथल्या एका कंपनीने सरकारला १.५८ कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.या बिलावरुन आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 'शिवस्वराज्य यात्रा'सुरू आहे. ही यात्रा काल रविवारी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे पोहोचली. यावेळी सभेत बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
"काल मी एक बातमी वाचली की, राज्याचे मुख्यमंत्री उद्योग आणण्यासाठी दावोसला गेले होते. दावोस स्विझर्लंडमध्ये आहे, तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन आमचा महाराष्ट्र कसा चांगला आहे हे सांगितलं असेल. ठाण्यात गेलं की मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोणता हॉटेलवाला बिल मागत नाही, मागायचही नाही आणि द्यायचंही नाही तशी सवयच नाही. हे तिकडे गेले आणि त्याच स्टाईलने परत आले, आता त्यांना दावोसमधील हॉटेलवाल्यांनी बिल पाठवलं आहे. आमचं बिल आम्हाला पाठवा, यांनी तिथे बिलच दिलेले नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
"महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी हे सरकार पूर्ण अपयशी आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे त्याचं प्रायश्चित भाजपाला देण्याचा योग उद्याच्या विधानसभा निवडणुकीत आहे. तो योग तुम्ही साधायचा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
राज्य सरकारला दावोसमधून नोटीस
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील मंत्री आणि काही अधिकारी जानेवारी महिन्यात स्वित्झर्लंडमधील दावोस जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते. मात्र आता या दौऱ्यातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या राहण्या-खाण्याचे बिलाची रक्कम देणे बाकी असल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्र सरकारला स्वित्झर्लंडस्थित सेवा क्षेत्रातील कंपनीकडून १.५८ कोटी रुपयांची बिले न भरल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या कंपनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था पाहण्याचे काम केले होते.