लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगली शहरातील अभयनगर परिसरातील आरोग्य केंद्राला आमदार सुधीर गाडगीळ व महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. यावेळी अपुरी जागा, शौचालयाची दुरवस्था, अपुरे डॉक्टर, कर्मचारी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अस्वच्छता, आदी समस्यांचा पाढाच डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वाचला.
सांगली शहरातील सुमारे दहा वर्षांपूर्वी सर्वांत जुने असणारे अभयनगर प्रभाग क्रमांक ९ मधील महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. सर्वांत पहिल्यांदा हे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय कर्मचारी अपुरे आहेत. प्रचंड लोकसंख्येमुळे एक केंद्र अपुरे पडत आहे. या ठिकाणी येथील कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. दवाखान्यामध्ये जागा अपुरी पडत आहे, पत्र्यांचे शेड असणारे हॉस्पिटल, त्याचे खिडकी, दरवाजा मोडलेला आहे.
आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळी हे याच रुग्णालयानजीक राहत असले, तरी गेल्या अनेक वर्षांपासून येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. मंगळवारी सकाळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी दरिबा बंडगर, धीरज सूरवंशी उपस्थित होते; तर सायंकाळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली.
यावेळी डॉ. संजीवनी घाडगे, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक मनगू सरगर, सहायक आयुक्त दत्ता गायकवाड, आरोग्य अधिकारी सुनील आंबोळी, आदी उपस्थित होते.
कोट
अभयनगरला ६६ लाख रुपयांचे रुग्णालय मंजूर आहे; परंतु जागामालक आणि महापालिका यांच्या वादामुळे ते काम रखडले आहे. आता महापालिका आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यास महापालिकेच्या सभेत परवानगी मिळालेली आहे. कोरोनामुळे लवकरच संजयनगर भागासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे.
- कांचन कांबळे, माजी महापौर