आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये आटपाडीचाच आमदार असणार आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी उभा राहण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यांच्या पाठीशी आटपाडीची जनता असणार आहे. मी स्वतः उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केला.करगणी (ता. आटपाडी) येथील आयोजित कार्यक्रमावेळी ब्रम्हानंद पडळकर बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे चिरंजीव आटपाडीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते.टेंभूच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याच्या आनंदप्रीत्यर्थ करगणी येथे साखर वाटप करण्यात आले. यावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर-आटपाडीचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडत ज्यांना आपण मदत केली, तेच पुन्हा त्रास देत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, साखर कारखान्याचा विषय असेल, किंवा आणखी बरेच विषय आहेत. आता ते येऊन सांगतील युती आहे, ही शेवटची निवडणूक आहे, पण आपण ऐकणार नाही. आता आपण टेंभूच्या पाण्याची साखर वाटतोय, परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या विजयाची साखर सुद्धा आपणच वाटायची आहे. आता मागे पुढे काही होणार नाही.यावेळी आम्ही ठरवलं आहे, हे मी खासदार पाटील यांच्या समोरच सांगतोय. राजेंद्रअण्णांना तयार केले आहे. त्यांचीही तयारी आहे, असे सांगतच माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे पाहत म्हणाले, नाही तर रात्री जेवायला बसल्यावर अण्णांना नको, आपल्याला कशाला? असलं काय म्हणत बसू नका. माझं जरा ऐका. त्यावर हसत हसत हर्षवर्धन देशमुख यांनी हातानेच असे काही होणार नसल्याचे सांगितले.
काका आम्हाला संभाळून घ्यापडळकर म्हणाले, मी लहान कार्यकर्ता आहे. खासदार संजय पाटील घरातलेच आहेत, मला आता गाडीत बसल्यावर बोलतील वाईट वंगाळ, ते काही जरी बोलले, तरी मी सहन करतो. काका आम्हाला समजून घ्या, तालुक्यावर लय अन्याय होत आहे. यावेळी ठरवलंय आम्ही आटपाडीचाच आमदार करणार आहे. त्यासाठी राजेंद्रअण्णाच आम्ही उभे करणार आहोत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.