मिरज तालुक्यातील दुधगाव येथे वारणा नदीवर बंधारा आहे. तो पूर्णपणे धोकादायक बनला आहे. त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे.
उन्हाळ्याची सुटी असल्याने वारणा नदीवर पोहण्यासाठी दुधगाव, सावळवाडी, माळवाडीतील युवकांची गर्दी असते. गेल्या आठवड्यामध्ये सावळवाडी येथील सोहेल शेख हा तरुण मित्रांसमवेत पोहण्यासाठी आला होता. त्याने हातात कॅन धरून बंधाऱ्यावरून उडी मारली. मात्र, हातातील कॅन निसटून सोहेल बंधाऱ्याच्या निघालेल्या दगडांमध्ये जाऊन अडकला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आमदार आवळे यांच्याकडे खोचीचे माजी उपसरपंच अमरसिंह पाटील यांनी दाद मागितली होती. आमदार राजू आवळे त्यांनी गुरुवारी सकाळी दुधगाव बंधाऱ्यावर अधिकाऱ्यांचे पथक सोबत घेऊन पाहणी केली. पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकारी नेहा देसाई व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी आमदार आवळे यांच्याकडे तातडीने बंधाऱ्याच्या डागडुजीची मागणी केली. बंधाऱ्याच्या डागडुजीबद्दल आमदारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी दुधगावचे सरपंच विकास कदम, खोचीचे सरपंच जगन्नाथ पाटील उपस्थित होते.