सांगली : राज्यातील शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या खिलार गाय व बैलांचे संरक्षण व्हावे, बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी लढा उभारला आहे. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केवळ राजकीय स्टंटबाजीसाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
मनसेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनसे व पश्चिम महाराष्ट्र खिलार गाय व बैल बचाव समितीच्यावतीने खिलार वाचविण्यासाठी लढा उभारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलांवर अत्याचार होत असल्याचे ग्राह्य धरून शर्यतीवर बंदी घातली. केंद्र सरकारने बैलाचा समावेश पाळीव प्राण्याऐवजी जंगली प्राण्यात केला. यामुळे केंद्रात १० वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपनेच हा तिढा सोडविणे अपेक्षित होते. असे असतानाही भाजपचे आमदार पडळकर यांनी केवळ राजकीय स्टंटबाजीसाठी बैलगाडी शर्यती घेऊन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.
शासनाने पुन्हा शर्यती सुरू व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, ॲड. विक्रमसिंह भोसले यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.