सांगली : महापालिकेतील भ्रष्ट नगरसेवकांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. मनसे स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असली तरी, प्रसंगी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याची तयारी आहे. पण त्याचा निर्णय अध्यक्ष राज ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.मनसेने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, भ्रष्ट नगरसेवकांनी महापालिकेत लुटीचा धंदा केला आहे. आता तर नगरसेवकच ठेकेदार बनले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी-भाजपची महाआघाडीच्या सत्ता काळातही भ्रष्ट नगरसेवकांच्या हाती कारभार होता. आताही तेच नगरसेवक पक्ष बदलून पुन्हा महापालिकेत येण्यास इच्छुक आहेत. त्यांना रोखण्यासाठी मनसे मैदानात उतरणार आहे. आम्ही २५ ते ३० जागा लढण्याची तयारी केली आहे. मनसेची ताकद लक्षात घेता, आघाडीसाठी इच्छुक आहोत. पण त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.शहराध्यक्ष अमर पडळकर म्हणाले, नितीन शिंदे आणि स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढणार आहोत. दुसरे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह आम्ही सर्वजण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सरचिटणीस नितीन सोनावणे म्हणाले, मिरजेत तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव भाजपमध्ये गेल्याची चर्चा सुरू आहे. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृत तसे काही कळविले नाही. ते पक्षासोबतच राहतील. शिवाय त्यांच्यासमवेत चारजणांचे पॅनेल मनसे उभे करणार आहे. ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविरोधात चारजणांचे पॅनेल उभे राहील.यावेळी आदित्य पटवर्धन, सुनीता इनामदार, लीना सावर्डेकर, रोहित घुबडे आदी उपस्थित होते.भ्रष्ट कारभाराचे चित्र बदलणार : स्वाती शिंदेप्रदेश उपाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून, त्यांना न्याय मिळत नाही. दिग्गज नगरसेवक पत्नी, मुलगी, भावजयींना मैदानात उतरवून जागा अडवतात. त्यांच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष कारभारी होतात. महिला भ्रष्ट कारभाराला कुठेच विरोध करीत नाहीत. यांचा लुटीचा अखंड कारभार सुरू आहे. हे चित्र मनसे बदलेल.
मनसेही सांगली महापालिकेच्या मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:12 AM