लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील होणारे अपघात, त्या अपघाताचे कारण व ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना यासाठीची नोंदणी आता थेट देशपातळीवर होणार आहे. यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयआरएडी (इंटिरग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस) मोबाईल ॲपचे काम सुरु झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत या ॲपव्दारे २८ अपघातांची नोंद झाली आहे. अपघात रोखणे व ज्याठिकाणी अपघात होतात त्याठिकाणी योग्य उपाययोजना करण्यासाठी या ॲपची मदत होत आहे.
जिल्ह्यात होत असलेल्या महामार्गाच्या जाळ्यांमुळे रस्त्यांचा दर्जा चांगलाच सुधारला आहे. काही मार्गावर अद्यापही कामे सुरु असलीतरी लवकरच सर्व मार्ग पूर्ण होणार आहेत याशिवाय राज्य मार्ग असलेल्या काही ठिकाणीही वाहतुकीची वर्दळ असते. यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. यापूर्वी केवळ अपघातांची नोंदणी करुन त्याच्या कारणांचा अहवाल तयार करण्यात येत असे. आता देशपातळीवरुन अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्यावतीने विविध उपाय योजले जात आहेत. त्यानुसार एखादा अपघाताची तात्काळ नोंदणी झाल्यास त्या ठिकाणी असलेले अडचणी रस्त्याच्या दुरवस्था यासह त्या ठिकाणावर पुन्हा अपघात होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना यासाठी हे ॲप उपयोगी ठरत आहे.
सध्या जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यातील कर्मचारी या ॲपचा वापर करून अपघात झाल्यास त्या ठिकाणचे फोटो, नेमके कारण याशिवाय इतर माहिती ॲपमध्ये नोंद करत आहेत. केंद्राने या मोहिमेत पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनाही सामावून घेण्याचे नियोजन केले आहे.
पोलीस दलाच्यावतीने यासाठीच्या प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यानुसार एनआयसीचे व्यवस्थापक पाेलीस ठाणेनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. यात पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या अपघातांची नोंद व तपासाशी निगडित बाबी नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे याशिवाय गेल्या ७६ दिवसांमध्ये झालेल्या अपघातांच्याही नोंदी यावर करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागात याची नोंद व माहिती पोलिसांना दिली जाणार आहे.
चौकट
ब्लॅक स्पॉटची संख्या कमी होणार
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी सुरू केलेल्या या मोबाईल ॲपच्या नोंदणीमुळे अपघातांबाबत नेमके कारण कळण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्ह्यात वारंवार एकाच ठिकाणी होत असलेल्या अपघातांच्या ठिकाणाला ‘ब्लॅक स्पॉट’ संबोधले जाते. ॲपवर नोंदणी झाल्यावर राष्ट्रीय पातळीवरुन यावर उपाययोजना सुचविल्या जाणार असून त्यामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ची संख्या कमी होऊ शकते.
कोट
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पोलिसांना या ॲपचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे अपघातांची नोंदणी व इतर माहिती अद्ययावत राहण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने काम सुरू होणार आहे.
प्रज्ञा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक तथा नोडल अधिकारी, आयआरएडी ॲप