घनश्याम नवाथेसांगली : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, पोलिस दलाकडे तक्रार आल्यानंतर ज्या क्रमांकावरून कॉल आला ते सिम कार्ड तत्काळ ‘ब्लॉक’ केले जाते; परंतु आता सायबर गुन्ह्यांमध्ये ‘आयएमईआय’ क्रमांक शोधून संबंधित फसवणूक करणाऱ्याचे सिम कार्डच नव्हे, तर मोबाइल हॅण्डसेटच कायमस्वरूपी ‘ब्लॉक’ केला जाईल. शेकडो सिम कार्ड वापरून पोलिसांच्या कारवाईपासून दूर राहणाऱ्या गुन्हेगारांचे मोबाइल हॅण्डसेटच कायमस्वरूपी बंद केल्यानंतर चांगलाच दणका बसणार आहे. सायबर पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.
सायबर गुन्हेगार प्रत्येकवेळी फसवणुकीचा नवीनच कोणता तरी फंडा घेऊन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे करत आहेत. याला सुशिक्षित मंडळीदेखील बळी पडत आहेत. ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा घडल्यानंतर संबंधित फिर्यादी सायबर पोलिस ठाण्याकडे किंवा स्थानिक पोलिस ठाण्याकडे तक्रार करतात. तक्रार आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यांकडून तपास केला जातो. ज्या मोबाइल क्रमांकावरून फसवणुकीचा प्रकार घडला असेल ते सिम कार्डच ब्लॉक करण्यात येते; परंतु सायबर गुन्हेगारांकडे शेकडो बनावट सिम कार्ड असतात. प्रत्येकवेळी वेगवेगळे सिम कार्ड वापरून ते फसवणूक करतात.बनावट सिम कार्डच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्यानंतर कार्ड ब्लॉक करूनही हे गुन्हे थांबतच नाहीत, असे पोलिस दलाच्या सायबर सेलच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता फसवणुकीचा गुन्हा घडल्यानंतर ज्या मोबाइल क्रमांकावरून गुन्हा केला जातो, ते सिम कार्ड ब्लॉक करण्याबरोबरच आता मोबाइल हॅण्डसेटचा ‘आयएमईआय’ क्रमांक शोधला जातो. त्यावरून संबंधित मोबाइल हॅण्डसेटच ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. दूरसंचार विभागाच्या वतीने ही कारवाई केली जात आहे.सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीत वापरले जाणारे सिम कार्ड ब्लॉक करण्याबरोबर आता हॅण्डसेट ब्लॉक करण्याचे कठोर पाऊल उचलले आहे. यामुळे भविष्यात एकाच हॅण्डसेटमध्ये वेगवेगळी सिम कार्ड टाकून फसवणूक करणाऱ्यांना या कारवाईचा मोठा फटका बसू शकतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे २८ हजारांहून अधिक मोबाइल हॅण्डसेट ब्लॉक करण्याचे आदेश सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनंतर दूरसंचार विभागाने दिले आहेत.
प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र हॅण्डसेट अशक्यसायबर गुन्हेगारांना बनावट सिम कार्ड मोठ्या संख्येने मिळू शकतात हे आजपर्यंत स्पष्ट झाले आहे; परंतु मोबाइल हॅण्डसेट एकदा ब्लॉक केल्यानंतर प्रत्येक गुन्ह्यासाठी नवीन हॅण्डसेट घेणे गुन्हेगारांना सहज शक्य नाही. त्यामुळे हॅण्डसेट ब्लॉक करण्याच्या कारवाईमुळे फसवणुकीचे प्रकार कमी होतील, असे सरकारला वाटते.
बनावट सिम कार्ड वापरून सायबर गुन्हे केले जातात; परंतु आता जर ‘आयएमईआय’ क्रमांक शोधून जर हॅण्डसेटच ‘ब्लॉक’ केले जाऊ लागले तर या गुन्हेगारीच्या मुळावरच घाव घातला जाईल. याचा परिणामही दिसून येईल. - दिनेश कुडचे, सायबरतज्ज्ञ, सांगली.