लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील गणपती पेठ येथून ५० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन तो विकण्याच्या तयारीत असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. घोगऱ्या ताजमहल भोसले (वय ४५, रा. सिध्देवाडी ता. मिरज) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
शहरात होत असलेल्या चाेरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगलीत गस्तीवर होते. यावेळी महानगरपालिकेच्या घरपट्टी कार्यालयामागे असणाऱ्या बोळात एकजण मोबाईल विक्रीसाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे जात संशयित भोसले याला ताब्यात घेतले. पण त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल मालकाचा शोध घेतला. त्यानुसार मयूर चंद्रकांत गाला यांचा मोबाईल त्यांच्या दुकानातून संशयिताने चोरल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात भोसले याला देण्यात आले.