सांगली : कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार दिनांक 18 मार्च 2020 रोजीचे रात्री 24.00 ते 31 मार्च 2020 रोजीचे रात्री 24.00 अखेर मिरज येथील हजरत पीर सय्यद शमना मीरासाहेब (रह) दर्गाह इमारत व दर्गाह पासून 100 मी. च्या परिसरात नागरिकांना, भाविकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे.तसेच सदर कालावधीमध्ये दर्गाह पूजा, दर्शनासाठी कोणत्याही नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. तथापि सदर दर्गाहाची नियमीत पूजा करण्यासाठी नियुक्त असणारे पुजारी यांना एका दिवशी एकावेळी कमाल 10 व्यक्तीसह पुजा करता येईल.
सदर पूजेच्या वेळी अन्य नागरिकांना पुजा पाहण्यासाठी अथवा दर्गाह प्रवेशासाठी मनाई केली आहे. दर्गाह सरपंच / पंच कमिटी यांनी या आदेशाचे पालन करावे, तसेच या आदेशाची प्रसिध्दी करावी. दररोज नियमीत पुजेसाठी नियुक्त पुजारी यांची यादी स्थानिक पोलीस ठाणे अधिकारी यांना देवून पुजेची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये यावेळचा हजरत पीर सय्यद शमना मीरासाहेब (रह) दर्गाह, मिरज च्या उरूसाच्या कार्यक्रमाची परवानगी दिलेली नाही.
या आदेशान्वये उक्त ठिकाणी जमावबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे दर्गाहच्या ऊरूसाचे संगीत कार्यक्रम, गलेफ मिरवणूक, दर्शन, नागरीका मार्फत पुजेचे विशेष विधी इत्यादी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अथवा भाविकांना एकत्र येवून गर्दी करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.या आदेशातील तरतुदींचा भंग करणाऱ्या व्यक्ती / संस्थेविरूध्द बंदोबस्तास असणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी तात्काळ फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी दिले आहेत.