सांगली : ढगांच्या गडगडाटासह सांगली, मिरज शहर व परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ११ मे पर्यंत पावसाचा मुक्काम जिल्ह्यात राहणार आहे.
सांगली शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. गेल्या तीन दिवसांपासून तुरळक स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. बुधवारी वळीव पावसाचा जोर वाढला. दुपारी साडेतीन वाजता ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तासभर बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. शहरात ढगांची दाटी कायम आहे. पावसामुळे तापमानात अंशत: घट झाल्याने उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ११ मे पर्यंत पाऊस जिल्ह्यात राहणार आहे. या काळात कमाल तापमान ३७ ते ३८ अंशावर तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार आहे. बुधवारी जिल्ह्याच्या किमान तापमानात अंशाने घट झाली.