मानाजी धुमाळ
रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथे गत महिन्याभरात शेतकऱ्यांनी वीसहून अधिक विहिरी काढल्या आहेत. विशेषत: पोकलॅन मशीनच्या साहाय्याने विहिरी खोदल्या जात आहेत.
रेठरे धरण गाव पुणे-बंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला तीन किलोमीटर अंतरावर शिराळा तालुक्याच्या हद्दीवर असून, या गावात शेतकऱ्यांच्या एकूण जमिनीचे क्षेत्र सुमारे सात हजार एकरवर असून, या गावात पुढील वर्षीपर्यंत वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी मिळणार आहे. त्या पाण्याच्या आशेवर शेतकरी आपल्या शेतात मशीनच्या साहाय्याने सुमारे चाळीस ते पन्नास फूट विहिरींची खुदाई करीत आहेत.
रेठरे धरण तलाव परिसर, बागरान, देशपांडे मळा, सुतारकी येथील शेतात विहिरी काढल्या आहेत. साधारणपणे ३० फूट व्यासाच्या व चाळीस ते पन्नास फूट खोल विहीर काढण्यासाठी तीन लाख ते चार लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. स्वमालकीच्या विहिरी खणल्यामुळे यापुढील काळात शेतकऱ्यांना ऊस पिकाचे उत्पन्न घेता येणार आहे.
मागील दहा वर्षांच्या काळात शेतकरी वर्ग यारीच्या माध्यमातून विहिरीमधील दगड माती बाहेर काढून मजुरांद्वारे विहीर खणत होते, कालांतराने शेतकऱ्यांना झटपट विहीर काढण्याच्या दृष्टीने पोकलॅन मशीनचा आधार वाटू लागला असून, वेळ व श्रम वाचविण्यासाठी हे मशीन फायद्याचे ठरत आहे.
चाैकट
यारी चालक बेकार
चाळीस वर्षांपूर्वी मजुरांच्या साहाय्याने विहीर काढली जायची, कालांतराने हीच विहीर यारी बसवून काढली जात होती; परंतु आता पोकलॅन मशीनद्वारे फक्त दोन ते चार दिवसांत काढली जात असून, आता यारी चालविणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.