सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भावाचेच नाते आहे. आता ते वेगळे झाले असले तरी, नाते तुटलेले नाही. दोन्ही भाऊ केव्हा एकत्र येणार, हे काळच ठरवेल, असे भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदी-ठाकरे भेटीवर केले. राज्य शासनाने कितीही चौकशा लावल्या तरी, आम्ही त्याला घाबरत नाही. भाजपने लोकहितोपयोगी कामेच केल्याचा दावाही त्यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी-ठाकरे भेटीबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीने ठाकरे यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घ्यायला हवी होती, पण शरद पवार, बाळासाहेब थोरात काय म्हणतील म्हणून ते थांबले असावेत. पण आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय असो अथवा नागरिकत्वाचा मुद्दा असो, ते स्पष्ट भूमिका घेत आहेत. मोदी आणि त्यांच्यात भावाचेच नाते आहे.बाबरी मशीद ट्रस्टबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. पण मशिदीबाबत ट्रस्टचा उल्लेख केलेला नाही. शरद पवार यांना बाबर सज्जन वाटत असेल तर, त्याच्या मशिदीच्या ट्रस्टसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे!वृक्षलागवड, जलयुक्त शिवार असे जनतेच्या हिताचे अनेक निर्णय भाजपने सत्ताकाळात घेतले होते. या प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश महाआघाडीने दिले आहेत. कितीही चौकशा करा, आम्ही त्याला घाबरत नाही. पण त्याचा अहवाल मात्र लवकर जनतेसमोर आणा. महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागच्या सरकारचे निर्णय रद्द करण्यापलीकडे कोणताच निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफीही फसली आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. या सगळ्याविरोधात २५ फेब्रुवारीरोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा पुनरूच्चारही पाटील यांनी केला.