सांगली : आमदार संभाजी पवारांनी त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून एकीकडे प्रयत्न चालविले असले, तरी त्यांच्या विरोधी गटाने या गोष्टीवर घराणेशाहीचा स्टॅम्प चिकटवून नरेंद्र मोदींच्या घराणेशाहीविरुद्धच्या वक्तव्याचा दाखला देण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी संभाजी पवारांच्या नावालाही त्यांनी विरोध केला आहे. भाजपअंतर्गत सध्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. पृथ्वीराज पवार, नीता केळकर, सुधीर गाडगीळ यांच्यासह पक्षातील अन्य लोकांनीही दावेदारी सुरू केली आहे. भाजपमध्ये येण्यापूर्वी उमेदवारीचे आश्वासन मिळावे, या प्रतीक्षेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिनकर पाटील आहेत. एकूणच पक्षातील व पक्षाबाहेरील इच्छुकांची संख्या अधिक आहे. संभाजी पवार यांना नीता केळकर यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. केळकर यांच्या बाजूने पदाधिकाऱ्यांचा एक गट कार्यरत आहे. पवार व केळकर गटांनी राज्य व केंद्रीय स्तरावरील नेत्यांची यापूर्वीच भेट घेऊन उमेदवारीबद्दल दावा केला आहे. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डातील सदस्यांकडेही त्यांनी फिल्डिंग लावली आहे. आपली दावेदारी करताना दुसऱ्याला तिकीट का दिले जाऊ नये, याचीही कारणे दिली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीत घेतलेल्या सभेत घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला होता. घराणेशाही संपविण्याचे जाहीर आवाहन मोदींनी केले होते. हाच धागा पकडत आ. पवार यांच्या पुत्रासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाला घराणेशाहीचे नाव देऊन विरोध होत आहे. संभाजी पवारांना विरोध करताना नीता केळकर यांनी यापूर्वीच लोकसभा निवडणुकीतील बंडखोरीचा दाखला दिला होता. भाजपचे गाडगीळ यांनी उमेदवारी मागताना पक्षांतर्गत विरोध न पत्करता दोन्ही गटांशी समान जवळीक साधली आहे. आ. पवारांना यापूर्वी कधीही विधानसभेच्या उमेदवारीसाठी इतकी ताकद लावावी लागली नव्हती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांना आयते मुद्दे मिळाले आहेत. पवारांना उमेदवारी मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)दोन्ही खासदार दोन गटांत विभागले गेले आहेत. उमेदवारी मिळविताना या दोन्ही गटांकडून दोन्ही खासदारांचीही ताकद पणाला लागणार आहे. शेट्टी हे महायुतीच्या केंद्रीय निवड समितीचे सदस्य आहेत, त्यामुळे पवारांना त्यांच्याकडून आशा आहेत. दुसरीकडे पवारविरोधी गटाने संजय पाटील यांना जवळ केले आहे. लोकसभेला केलेल्या बंडखोरीची आठवणही संजय पाटील यांना वारंवार करून दिली जात आहे.
मोदींचा दाखला, घराणेशाहीला धक्का
By admin | Published: July 22, 2014 11:08 PM