नेवरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडेगाव तालुक्यातील रायगावला भेट देऊन दोन हजार एकरावरील भारतातील पहिल्या स्वयंचलित पाटबंधारे योजनेची पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली. तासगाव येथे नुकत्याच झालेल्या सभेवेळी व्यासपीठावर देशमुख यांनी पंतप्रधानांना कागदांचा एक गठ्ठा आणि काही छायाचित्रे दिली. त्यावेळी दोघांच्यात दोन मिनिटे संवादही सुरू होता. सभेनंतर पत्रकारांनी याबाबत विचारले असता देशमुख यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, चार वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एक शिष्टमंडळ इस्रायलला अभ्यासासाठी नेले होते. त्यामध्ये माझा आणि त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांचाही समावेश होता. यावेळी पाटबंधारेची स्वयंचलित यंत्रणा जो शेतकरी स्वत: राबवू शकेल आणि हजारो एकरावर तिचा फै लाव असेल, अशा यंत्रणेची माहिती देण्यात आली होती. मोदी यांनी गुजरातमध्ये ही यंत्रणा राबविण्याचा विचार केला होता. गेल्या चार वर्षात इस्रायल तंत्रज्ञानाच्या मदतीने रायगावात दोन हजार एकरावरील या प्रकल्पास देशमुख यांनी प्रारंभ केला.त्याची वेगवेगळ्या टप्प्यावर प्रगती पूर्ण झाल्यानंतरचे संकल्पचित्र यासह सर्व प्रकल्प देशमुख यांनी पंतप्रधानांना दिला आणि इस्रायल दौऱ्याची आठवण करुन दिली. आपल्याला आजही त्या प्रकल्पाचे महत्त्व वाटते आणि तो पूर्ण होताच माझ्याशी संपर्क साधा, मी रायगावला नक्की भेट देऊन या प्रकल्पाचा देशभर प्रसार करेन, असे आश्वासन मोदी यांनी दिले आहे, असे देशमुख यांनी सांगितले. (वार्ताहर)
रायगावला भेट देण्याची मोदींची इच्छा
By admin | Published: October 07, 2014 10:53 PM