सांगली : मिरज विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस नेत्यांनी दावा सांगत तेथून मोहन वनखंडे यांच्या नावावर एकमत केले आहे. सांगली विधानसभेतील उमेदवारीवरुन पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांच्यातील वाद मिटविण्यात काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम यांना यश आले नाही. यामुळे सांगली विधानसभेचा उमेदवार कधी ठरणार, असा प्रश्न कार्यकर्ते, नेत्यांनी उपस्थित केला. सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघातील नाव निश्चित करून पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षक व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतल्या होत्या. या मुलाखतीचा अहवाल प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सादर केला आहे. यामध्ये सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत. या दोन्ही जागांवरील उमेदवारांचा वाद संपविण्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे पाठविलेल्या अहवालात प्रणिती शिंदे यांनी मत नोंदविले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगलीतील विशाल पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीस सांगली विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, मिरजेचे मोहन वनखंडे यांच्यासह काँग्रेसचे मिरजेतील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याचे निश्चित झाले असून, पक्षश्रेष्ठींनी त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. या मतदारसंघातून मोहन वनखंडे यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांचेही एकमत झाले आहे. वनखंडे यांचे नाव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे.
काँग्रेसकडून यांची उमेदवारी निश्चितकाँग्रेस पक्षाकडून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. विश्वजित कदम, जतमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत या दोन जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत. सांगली मतदारसंघातील उमेदवार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झाले नाहीत. सध्या मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले मोहन वनखंडे यांचे नाव जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी निश्चित केले आहे.