सांगली : मोहोळ (जि. सोलापूर) येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगार यल्लाप्पा उर्फ खल्या आदरक शिंदे (वय ४२) हा सोन्याचांदीचे दागिने विकण्यासाठी आला असता सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून सहा लाख ७३ हजार रुपये किंमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात दिवसा व रात्री घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली आहे.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडीतील गुन्हेगारांच्या शोधासाठी सहाय्यक निरीक्षक सिंकदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकातील काॅन्स्टेबल राजू शिरोळकर यांना यल्लापा शिंदे हा चोरीतील दागिने विक्रीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरातील बसवेश्वर उद्यानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिरज सिव्हिल रुग्णालय परिसरात सापळा लावला. यल्लाप्पा हा पिशवी घेऊन उद्यानासमोर उभा असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. पोलिसांनी दागिन्याबाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडून ६ लाख किंमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ७३ हजार रुपये किंमतीचे एक किलो चांदीचे दागिने असा ६ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला मिरज ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
Sangli: दागिने विकायला आला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला; पावणे सात लाखाचे दागिने जप्त
By शीतल पाटील | Updated: November 13, 2023 17:55 IST