सांगली : घरफोडी, चोरी, मारहाणीसह इतर गंभीर गुन्हे करत दहशत निर्माण करणाऱ्या शाहरूख नदाफ व त्याच्या पाच साथीदारांवर गुरुवारी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली. सहा पोलीस ठाण्यांत या टोळीवर २४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानेच या टोळीवर कारवाई करण्यात आली.
शाहरूख रूस्तम नदाफ (वय १९, रा. त्रिमूर्ती कॉलनी), सोहेल ऊर्फ टोल्या गफूर तांबोळी (२०), संतोष ऊर्फ ऋतिक शंकर चक्रनारायण (१९, दोघेही रा. सध्या हनुमाननगर, मूळ सोलापूर), अजय ऊर्फ वासुदेव भोपाल सोनवले (२०, विठ्ठलनगर, शंभरफुटी रोडजवळ) यांच्यासह दोन अल्पवयीनांचा यामध्ये समावेश आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहरूख नदाफ याने सर्व सदस्यांना एकत्र करीत टोळी निर्माण केली होती. या टोळीने सांगली ग्रामीण, सांगली शहर, संजयनगर, विश्रामबाग, महात्मा गांधी चौकी व मिरज शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केले आहेत. घरफोडी, चोरी, घरात घुसून दहशत माजवित मारहाण, दरोडा, जिवे मारण्याचा प्रयत्न यांसह इतर गुन्हे केले आहेत.
९ जुलै २०१९ रोजी दादासाहेब शिवाजी काळे व अवधूत केदार हे ट्रकच्या केबिनमध्ये झोपले असताना, या टोळीने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून व कोयत्याचा धाक दाखवून १५०० रूपये काढून घेतले होते. त्याचवेळी शेजारी उभ्या असलेल्या सिमेंटने भरलेल्या ट्रकची काच फोडून ट्रकचा चालक फत्तेअहमद लालामत सौदावर याला मारहाण करत ४ हजार रुपये काढून घेतले होते. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद होती. टोळीची वाढती दहशत लक्षात घेऊन महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांना सादर केला होता. हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली आहे. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला.
टोळीत सर्व तरुणशाहरूख नदाफने तयार केलेल्या टोळीतील सर्वजण अवघ्या वीस वर्षे वयोगटातील तरुणच आहेत, तर दोन अल्पवयीन आहेत. अवघ्या विशीतील तरुणांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे सुरू केल्याने त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.