मिरज : मिरजेत शास्त्रीनगर, साठेनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी गुरुवारी चावा घेऊन चार बालकांसह आठजणांना जखमी केले. याबाबत तक्रार करूनही मोकाट कुत्र्यांंच्या बंदोबस्ताकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी मोकाट कुत्र्याला ठार मारून, ते मृत कुत्रे महापालिकेतील आरोग्य अधिकाºयांच्या टेबलवर आणून ठेवले व प्रशासनाचा निषेध केला.मिरजेत शहरभर वावरणाºया मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. गुरुवारी शास्त्रीनगर व साठेनगर येथे मोकाट कुत्र्याने अथर्व भोरे (वय ४), अनिकेत सुभाष गोसावी (७), सागर चन्नाप्पा कांबळे (१०), महंमद शेख (६), यश भोसले (६) या बालकांसह आठजणांना चावा घेऊन जखमी केले. कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे शास्त्रीनगर, साठेनगर, पवार गल्ली परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी दखल न घेतल्याने, एका कुत्र्याला ठार मारून ते मृत कुत्रे महापालिका कार्यालयात नेऊन आरोग्य अधिकाºयांच्या टेबलवर टाकले.जिल्हा सुधार समितीचे तानाजी रूईकर, मुकुंद भोरे, नितीन मोरे, रामदास भोरे, ओंकार भोरे, प्रकाश कवाळे, राहुल भोरे, पप्पू भोरे, नंदा भोरे, सुलोचना भोरे, दीपा भोरे, रोहित कांबळे, अवधूत कांबळे, अजिंक्य भोरे यांच्यासह नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध केला. लोकांच्या तक्रारी वाढल्यानंतरच काही काळापुरती कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मोहीम राबविली जाते. त्यानंतर पुन्हा सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केले जाते. मोकाट कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे.
मिरजेत मोकाट कुत्र्यांचा हल्ला; आठ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:21 AM