तासगाव , दि. १८ : वायफळे (ता. तासगाव) येथे ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषादरम्यान विरोधी उमेदवारांच्या घराच्या दारावर दगडफेक करून गुलाल उधळण्यात आला. याला विरोध करणाऱ्या महिलेचा यावेळी विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
वायफळे ग्रामपंचायतीत भाजपने यश मिळविले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गावात व मळेभागात जल्लोष केला. या जल्लोषादरम्यान भाजपचे कार्यकर्ते हुल्लडबाजी करीत राष्ट्रवादीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नानासाहेब पाटील यांच्या घरासमोर गेले.
त्यांनी पाटील यांच्या घरासमोर फटाके लावले, गुलाल उधळला. घरावर दगड टाकले. या दगडफेकीत घराच्या पत्र्याचे नुकसान झाले. तेथे त्यांना विरोध करणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आला.
याप्रकरणी अर्जुन परशराम पाटील, रामचंद्र नेताजी पाटील, मेघनाथ रामचंद्र पाटील, सूरज लहू नलवडे (सर्व रा. वायफळे, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार अमित कृष्णा सावंत यांच्या घरासमोरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. सावंत यांच्या घराच्या दारावर दगड टाकले. त्यांच्या आजी, आजोबांना शिवीगाळ केली. घरावर गुलाल टाकला. अमित यांचे नाव घेऊन धमकावण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी नूतन सरपंच इंदाबाई नलवडे यांचा मुलगा संदीप गुणवंत नलवडे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती साहेबराव पाटील यांचा मुलगा अमर पाटील, धनाजी हणमंत पाटील, विश्वनाथ अजित सुतार (सर्व रा. वायफळे, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.