लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोह कोणताही असो, तो वाईटच! त्यातही अजाणत्या वयात झालेला मोह आयुष्याची राखरांगोळी करून टाकतो. सध्याच्या मोबाइलच्या युगात झालेली ओळख, ओळखीतून मैत्री आणि निर्माण झालेल्या आकर्षणापोटी मुलींच्या घरातून पलायनाच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात जिल्ह्यातून १६९ मुलींनी पलायन केले असून त्यातील १४१ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले असून २८ मुली अद्यापही बेपत्ताच आहेत.
अजाणत्या वयात झालेली मैत्री आणि त्यातून घरातून पलायन केल्याने दोन्ही कुटुंबांची ससेहोलपट होत असते. त्यामुळेच पोलीस प्रशासनातर्फे यासाठी समुपदेशन सुरू केले आहे. पलायनाचा प्रयत्न केलेल्या मुलींचे तज्ज्ञांकडून समुपदेशन करून त्यांना पुन्हा कुटुंबाच्या हवाली केले जाते.
सध्या मोबाइल सर्वांच्या हाती झाल्यानेही या घटनांत वाढ झाली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षणासह अनेक पर्याय मोबाइलवर आल्याने पालकांना आपली मुलगी शाळेचाच अभ्यास करत असल्याचे वाटत असते. मात्र, यातून नको तिथे संपर्क वाढून त्यातून अनेक जण अशा मुलींना आपल्या जाळ्यात ओढून पलायन करत आहेत. यातील बहुतांश मुली या काही दिवसांनंतर परत येतात, तर काहींचा पोलीस शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतात. सज्ञान आणि ठरवूनच घराबाहेर पडलेल्या मुलींचा मात्र ना शोध लागतो ना, त्याही परत आपल्या कुटुंबांकडे येतात.
चौकट
२८ मुलींचा शोध लागेना
गेल्या वर्षभरातील आकडेवारी बघितली, तर त्यातील पलायन केलेल्या मुलींपैकी बहुतांश मुलींचा शोध लागला आहे. मात्र, २८ मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही.
चौकट
अल्पवयीन मुलींची अधिक संख्या
पलायन केलेल्या मुलींच्या वयोगटाचा विचार करता, अल्पवयीन मुलींची संख्या अधिक आहे. यातील अनेक मुली वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर थेट पोलिसात हजर होतात, असाही अनुभव आहे. तर, अनेकवेळा पालकांच्या संमतीने त्यांचा विवाह लावला जातो.
चौकट
लॉकडाऊनमध्येही भागम् भाग
गेल्यावर्षी बहुतांश काळ हा कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये गेला, तरीही एप्रिल, मे, जून या महिन्यांतही मुलींच्या पलायनाच्या घटना घडल्या आहेत.
कोट
मुलींच्या पलायनाच्या घटनांची नोंद झाल्यानंतर स्थानिक पोलीस त्याचा तपास करतात. तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा शोध घेऊन त्या मुलींचे समुपदेशन केले जाते. त्यामुळे अशा घटना कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न होत असतात.
- मायादेवी काळगावे, सहा. पाेलीस निरीक्षक
चौकट
कोणत्या महिन्यात किती पलायन
जानेवारी १५
फेब्रुवारी १९
मार्च २१
एप्रिल ५
मे १३
जून १२
जुलै ७
ऑगस्ट १४
सप्टेंबर १४
आक्टोबर १४
नाेव्हेंबर १५
डिसेंबर २०
एकूण १६९